Team India : आशिया कपसह या स्पर्धेसाठीही मंगळवारी भारतीय संघाची घोषणा होणार!
GH News August 19, 2025 12:14 AM

क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आशिया कप स्पर्धेसाठी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा करु शकते. मात्र मंगळवारी 2 भारतीय संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या संघात कुणाला संधी मिळणार? याकडेही क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे. बीसीसीआयकडून मंगळवारी आगामी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेसाठी ओपनर आणि लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्मा हीला संधी मिळणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये चुरस असणार आहे. मात्र पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेसाठी निवड समितीकडून भारतीय संघात कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार? याचीच उत्सूकता आहे.

मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची बैठक होणार आहे. त्यानंतर आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर नितू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली जाणार आहे. हरमनप्रीत कौर या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच या स्पर्धेसाठी इंग्लंड दौऱ्यातील बहुतांश खेळाडूंनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताने इंग्लंडचा इंग्लंडमध्ये टी 20i आणि वनडे सीरिजमध्ये धुव्वा उडवला होता.

शफालीला संधी मिळणार?

स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही जोडी ओपनिंग करणार असल्याची आशा आहे. या जोडीने इंग्लंडमध्ये आपली छाप सोडली. प्रतिकाने शफालीच्या जागी खेळताना दमदार बॅटिंग केली. तर शफालीला निराशाजनक कामगिरीमुळे डच्चू देण्यात आला होता.

शफालीने इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेतून कमबॅक केलं होतं. मात्र शफालीला वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आली नाही. तसेच शफाली इंडिया एसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही काही खास करु शकली नाही. त्यामुळे शफालीला वनडे वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार का? याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

हर्लीन देओलचं काय?

हर्लीन देओल हीलाही सातत्याने संधी देण्यात येत आहे. मात्र हर्लीन देओलला काही खास करता आलेलं नाही. तसेच क्रांती गौड आणि श्री चरणी या दोघींनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या बॉलिंगने छाप सोडली आहे. त्यामुळे या दोघींना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून अरुंधती रेड्डी, फिरकीपटू म्हणून स्नेह राणा, राधा यादव आणि दीप्ती शर्मा यांची निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.