Kalhapur Rain update: 'काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार'; पंचगंगेच्या पातळीत वाढ, २१८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले
esakal August 18, 2025 09:45 PM

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार आजही सुरू राहिली. तसेच धरण क्षेत्रातही जोरदार हजेरी लावल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिला. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत झाली. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्री २७ फूट चार इंच इतकी होती. राधानगरी धरणाचे चारही दरवाजे खुले झाले असून, त्यामधून ७२१२ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. त्याचबरोबर धामणी धरणातून ३५८८, घटप्रभा धरणातून २५३१, दूधगंगा धरणातून ८५००, जांबरे धरणातून ५१३ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

राधानगरी : तालुक्यात मुसळधार वृष्टी सुरूच आहे. तालुक्यातील तिन्ही धरणातून अतिरिक्त पाणी सोडले आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज खुले झाले असून यातून ५७१२ क्युसेक व पायथ्याच्या वीजघरातून १५०० क्युसेक असे मिळून ७२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तर काळम्मावाडी धरण निर्धारित पाणी क्षमतेइतके भरले आहे. याच्याही वीजगृहासाठी पाणी सुरू करण्यात आले आहे.

रविवारी राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले होते. यातील एक बंद झाला होता. पुन्हा आज दुपारी तिसरा दरवाजा उघडला तर सायंकाळी चौथा दरवाजाही खुला झाला. त्यामुळे भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे. राधानगरी धरण क्षेत्रावर आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर गेल्या तीन दिवसांत ३२० मिलिमीटर इतका पाऊस नोंदला आहे. काळम्मावाडी धरण यंदा २२ टीएमसी इतक्या निर्धारित पातळीला नियंत्रित करण्यात येणार आहे. आज ही पातळी २२.१२ इतकी झाली असून पाणी नियंत्रित करण्यासाठी पायथ्याच्या वीजगृहातून पंधराशे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

माजगाव : पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कासारी पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यवलूज-पोर्ले बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी पहाटेपासून दमदार पाऊस सुरू असून ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठावरील सखल भागातील ऊस तसेच गवताची कुरणे पाण्याखाली गेली आहेत. हा पाऊस भात पिकांसाठी व आडसाली ऊस लागणीसाठी उपयुक्त आहे.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी तुळशी धरणातून ५०० क्युसेक विसर्ग

धामोड : येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी नदीपात्रामध्ये तीन दरवाजातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून, तुळशी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, पाणी पातळी ६१६.४४ मिमी इतकी झाली आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मागील २४ तासांत ६० मि.मी. पाऊस झाला आहे. धरणात एक जूनपासून आजअखेर एकूण पाऊस २८१८ मि.मी.इतका पाऊस झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.