अंकलखोप : शेतातील विहिरीवरील वीज पंपाचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घन:श्याम बजरंग कुराडे (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची वर्दी आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष काळे यांनी आष्टा पोलिसांत दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील कुराडे मळ्यातील घन:श्याम कुराडे शनिवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरखर्चाचे व जनावरांसाठी पाणी भरण्यासाठी वीज पंप सुरू करण्यासाठी घरासमोरील विहिरीवर गेले होते. त्याच वेळी त्यांना मोटरीचा धक्का लागून ते कोसळले. घरातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घन:श्याम बैलांच्या साह्याने शेत मशागतीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घन:श्याम हा घरातील कमावता होता. मजुरी व शेतीकाम करून घर चालवणारा, घराचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर संकट आल्याने ग्रामस्थ, नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. अधिक तपास भिलवडी पोलिस करत आहेत.