84982
कुक्कुट संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करु
आमदार किरण सामंतः उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा लांजा येथे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः रत्नागिरी जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून नागरी सुविधा निर्माण करतानाच येथील जनतेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम स्व. शिवाजीराव सावंत यांनी केले. सहकारातून त्यांनी लांजा तालुक्यात सुरु केलेल्या कुक्कुट व्यावसायिक संस्थेने नावलौकिकता मिळवला आहे. त्यामुळे लांजा तालुका कुक्कुट व्यावसायिक संस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहु, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेतर्फे माजी आमदार स्व. शिवाजीराव सावंत यांच्या जन्मताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यवसायिक संस्थेचे अध्यक्ष विवेक सावंत, कृषी व समाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र गितये, अॅड. सुजित झिमण, लांजा एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम तथा भाऊ वंजारे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, कुक्कुटपालन संस्थेचे संचालक सचिन भिंगार्डे उपस्थित होते.
यावेळी आमदार सामंत यांच्या हस्ते लांजा तालुक्यासह जिल्ह्यात समाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यात लेखक-सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, समाजिक कार्यर्ते सुभाष लाड, महेश बामणे, राजेश गोसावी, अंकुश गुरव, रवींद्र कोटकर, मारुती आळकुटे, अर्चना पेणकर, अथर्व हर्डीकर, राधेय पंडित, संतोष शेट्ये यासह अन्य व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.