मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत होताच. अधुन-मधुन पावसाच्या जोरदार सरी येऊन जायच्या. पण काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. आज पहाटेपासून पावसाने मुंबईत जोर पकडला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी मुंबईच्या वेगाला ब्रेक लागण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावते असं म्हणतात. सकाळी चार वाजल्यापासून मुंबईत लगबग सुरु होते. पण आता बातमी लिहित असताना अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला असून बेस्ट बसेस आणि मुंबईची लोकल वाहतूक कोलमडली आहे.
सकाळी कामावर जाण्यासाठी घर सोडणाऱ्या नोकरदरांचे हाल होत आहेत. एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वेग मंदावल्याने ठरलेल्या वेळेत कार्यालय गाठता येत नाहीय. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लेटमार्क निश्चित आहे. लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. पावसामुळे मुंबईत कुठे, काय स्थिती आहे? जाणून घेऊया.
कुठल्या मार्गाच्या लोकल सेवेवर परिणाम?
– दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईहून कसारा आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. पावसाचा फटका लोकल सेवेला बसण्यास सुरुवात झाली आहे.
– अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर पावसाचा फटका. लोकल सेवा तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने सुरु आहे.
मुंबईत पाणी कुठे-कुठे साचलय?
– मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम सखल भागात दिसून येतोय. पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद. दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचले आहे.
– मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात. जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचण्यास सुरुवात झाली.
– वडाळा, कुर्ला आणि दादर पारसी कॉलनी येथे गुडघाभर पाणी साचलं आहे.
मुंबईत संततधार पावसामुळे चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्टेशन, आंबेकर नगर, समर्थ नगर, भक्ती धाम रोड, धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, वि.एन.पूर्व मार्ग येथे पाणी साचलं आहे.
स्वदेशी मिल कामगाराच्या घरात पावसाचे पाणी आले आहे.
परळ हिंदमाता, सायन गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं आहे.
विरारमध्ये काय स्थिती?
विरार पश्चिम युनिटेक परिसरातील 40 इमारती पाण्याखाली
युनिटेक कॉम्प्लेक्स मधील 1 ते 37 नंबरच्या सर्व सोसायटीमधील इमारतीच्या तळ मजल्यात गुडगाभर पाणी साचले आहे.
पूर्ण परिसर जलमय झाला असून, युनिटेक कॉम्प्लेक्सला तलावाचे स्वरूप आले आहे.
रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने विरार पश्चिम यूनिटेक 35 ते 40 सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
महापालिकेने सक्शन पंपाने पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.