
‘टीम इंडिया’चा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे त्याने ही फिटनेस टेस्ट पास केली. त्यामुळे 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार ‘टीम इंडिया’चे नेतृत्व करणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
जून महिन्यात जर्मनीतील म्युनिक येथे सूर्यकुमारच्या पोटाच्या उजव्या खालच्या भागातील हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले की, ‘सूर्यकुमारने फिटनेस टेस्ट पास केली असून, तो आशिया चषकात हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करण्यासाठी उपलब्ध असेल. तो काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘सीओई’मध्ये पुनर्वसन प्रक्रियेत होता. आता त्याला पूर्णपणे फिट घोषित करण्यात आले आहे. आता तो हिंदुस्थानी संघ निवड बैठकीला उपस्थित राहणार आहे.’
आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान दुबई येथे खेळवला जाणार आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना 14 सप्टेंबरला रंगणार आहे. ‘बीसीसीआय’ची संघनिवड समिती मंगळवारी मुंबईत संघ जाहीर करणार आहे.
जूनमध्ये यादवने आपल्या शस्त्रक्रियेनंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिले होते, ‘लाईफ अपडेटः पोटाच्या उजव्या खालच्या भागातील स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर झपाट्याने त्यात सुधारणा होत आहे. लवकरात लवकर पुन्हा मैदानात परतण्याची उत्सुकता आहे.’
आयपीएल आणि मुंबई टी-20 लीगमध्ये खेळून झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने स्पोर्ट्स हर्नियासाठी युनायटेड किंगडममध्ये तज्ञांचा सल्ला घेतला होता. त्याला यापूर्वी 2023 मध्येही हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागली होती. तसेच गेल्याच वर्षी त्याच्या टाचेवरदेखील शस्त्रक्रिया झाली होती.
आयपीएलमध्ये सूर्यकुमारचा धमाका
आयपीएल 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 717 धावांची लयलूट करीत सचिन तेंडुलकरनंतर एका हंगामात मुंबईसाठी 600 हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन (759) याच्यापाठोपाठ तो सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानी राहिला.