ऐतिहासिक निर्णय होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भेटीकडे जगाच्या नजरा, घडामोडींना वेग
Tv9 Marathi August 18, 2025 02:45 PM

15 ऑगस्ट 2025 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. या बैठकीच्या मुख्य अजेंडा रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा होता. मात्र, या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली अनेक वर्षानंतर अशाप्रकारची बैठक डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात झाली. या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प  यांनी थेट युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना फोन केला आणि बैठकीमध्ये काय घडले याबद्दल सविस्तर माहिती दिली. यासोबतच त्यांनी वोलोदिमीर जेलेंस्की यांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर आज वोलोदिमीर जेलेंस्की हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होणार आहे.

युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्यासाठी रशियाने काही महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत. त्या सर्व अटी डोनाल्ड ट्रम्प हे वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यासमोर मांडणार आहेत. जर त्यांनी मान्य केल्या तर कदाचित काही वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपेल. मात्र, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा झुकाव हा रशियाच्या बाजूने आहे. युक्रेनकडून या अटी मान्य केल्या जातात का हे पाहण्यासारखे महत्वाचे ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर जेलेंस्की यांची यापूर्वीची बैठक वादग्रस्त ठरली होती. चक्क बैठक अर्ध्यामध्येच सोडून वोलोदिमीर जेलेंस्की हे गेले होते. थेट मिडियासमोरच दोघांमध्ये वादावादी झाली. आता या बैठकीनंतर काही निर्णय होतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुतिन यांच्यासोबतच्या एकाच भेटीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झुकाव रशियाच्या बाजूने झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दुसरीकडे रशियाकडे कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशावर अमेरिकेकडून कारवाई केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशातील संबंध चांगले झाल्याचे बघायला मिळतंय. दोघांनीही भेट चांगली झाल्याचे म्हटले आहे. आता आजच्या वोलोदिमीर जेलेंस्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीतून काय मार्ग निघतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भारतावर अमेरिकेकडून टॅरिफ लादल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वोलोदिमीर जेलेंस्की यांनी फोन केला होता आणि काही वेळ दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.