भूषण ओक- शेअर बाजार विश्लेषक
मु ख्यतः स्टील पट्ट्या, ट्यूब आणि पाइप उत्पादनांसाठी १९७५ मध्ये स्थापन झालेल्या पेन्नार इंडस्ट्रीज लि. कंपनीने १९८८ मध्ये इंजिनिअरिंग उत्पादने म्हणजे बांधणी, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात पदार्पण केले.
आतापर्यंत या क्षेत्रात जवळजवळ चार दशकांचा अनुभव असलेली ही कंपनी आता ग्राहकांच्या गरजेनुरूप स्टील उत्पादने, रेल्वे उपप्रणाली, मोटारगाड्यांचे सुटे भाग आणि सांगाडे, बॉयलर आणि औद्योगिक क्षेत्रात लागणारे अनेक प्रकारचे तंतोतंत अचूक असे अभियांत्रिकी भाग (प्रिसिशन इंजिनिअरिंग पार्ट) बनवते.
या कंपनीच्या एकूण उलाढालीत वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी उत्पादनांचा वाटा ५२ टक्के, तर कस्टम डिझाइन केलेल्या प्रीफॅब्रिकेटेड इमारतींचा सुमारे ४८ टक्के वाटा आहे. अमेरिकेत अशा प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंगसाठी भरपूर मागणी आहे. कंपनी संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातही प्रवेश करत आहे. कंपनीचे देशभरात १३ ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत आणि तेथे ४८०० कर्मचारी काम करतात. कंपनीची निर्यात एकूण महसुलाच्या सुमारे २७ टक्के आहे.
कंपनीच्या ग्राहकांमध्ये अशोक लेलँड, यामाहा, इमर्सन, वॅबको, टोयोटा बोशोकू, आरबीएस ग्रुप, स्कॉट इंडस्ट्रीज, आयसीएफ, वा टेक वाबाग, कल्पतरू, ट्रायडेंट ऑटो, टाटा पॉवर आदींचा समावेश आहे. कंपनीजवळ सध्या भारतात ७८० कोटी आणि अमेरिकेत ४५० कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये १० टक्क्यांवर व्यवसायवाढ आणि १० टक्क्यांवर ईबिटा मार्जिन कमावण्याची खात्री बाळगून आहे. सध्याचा आरओसीई १६ टक्के आहे, मात्र दीर्घावधीत हे गुणोत्तर ३० टक्के करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
आर्थिक आकडेवारीकंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांमध्ये १३ टक्के आणि ४२ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. कंपनीच्या कार्यचालन मार्जिन चार वर्षांमध्ये ८-१० टक्के स्थिर आहेत. २०२५ मध्ये कंपनीने ३२२७ कोटी रुपयांची विक्री केली आणि ११९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा दाखवला. कंपनीच्या व्यवसायात भांडवल जास्त लागते आणि त्यामुळे कंपनीचे कर्जभांडवल गुणोत्तर ०.८१ म्हणजे थोडे जास्त आहे आणि ते ०.७ पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. रोकड आवक उत्तम आहे आणि खेळत्या भांडवलाचे नियोजन ठीक आहे. कंपनीचा ताळेबंद २९५४ कोटी रुपयांचा असून, स्थिर संपत्ती गेल्या वर्षात २०० कोटी रुपयांनी वाढली आहे. याचा परिणाम या वर्षीपासून विक्रीवाढीत दिसण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रवर्तक, परदेशी वित्तसंस्था आणि देशी वित्तसंस्थांनी अनुक्रमे २ टक्के, ६.२ टक्के आणि १.७ टक्के भागभांडवल वाढवले आहे. ही एक सकारात्मक बाब आहे.
मूल्यांकनया कंपनीचे बाजारमूल्य २८७१ कोटी रुपये असून, तिचा शेअर सध्या २३ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे १७.५ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा थोडे जास्त आहे. पीईजी ०.५५ म्हणजे वाजवीपेक्षाही स्वस्त आणि ईव्हीईबिटा गुणोत्तर ९.६ म्हणजे आकर्षक आहे. अॅसेट टर्नओव्हर १.२ म्हणजे उत्तम आहे. विक्री पुस्तकी मूल्य गुणोत्तरही २.९ म्हणजे वाजवी आहे. करंट रेशो आणि क्विक रेशो ही कर्जाशी संबंधित गुणोत्तरे मात्र १.१४ आणि ०.५८ म्हणजे जरा कमी आहेत. ती कमीतकमी १.२ आणि १.० असायला हवीत. कंपनीला कर्जफेडीत थोडा त्रास आहे, असे दिसते. यासाठी खेळत्या भांडवलाचे उत्तम नियोजन आणि कर्ज कमी करण्याची आवश्यकता आहे.
Paytm Stock: पेटीएम निष्कर्षकंपनीचे आकडे चांगले आहेत. मूल्यांकन वाजवी आहे. मात्र, ही एक हळूहळू वाढणारी कंपनी आहे. हा डिफेन्सिव्ह शेअर म्हणतात तसा शेअर आहे, त्यामुळे यातील गुंतवणुकीतून नाट्यमय परतावा मिळण्याची अपेक्षा बाळगू नये.