राजधानीत पावसाचा कहर! मुंबई विद्यापीठाचा परीक्षांबाबत तडकाफडकी मोठा निर्णय!
Tv9 Marathi August 19, 2025 03:45 PM

Mumbai Exams Postponed : संपूर्ण राज्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नदी, नाले ओसंडून वाहात आहेत. मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेले आहेत. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतला असून स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई, उपनगर परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असे असतानच आता मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय समोर आला आहे. विद्यापीठाने मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाने नेमका काय निर्णय घेतला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता विद्यार्थीहित व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या 19 ऑगस्ट 2025 रोजीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित वेळेनुसार होणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी आयोजित असलेल्या परीक्षांमध्ये मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नालिझम सत्र ३, पीआर सत्र ३, टेलेव्हिजन स्टडीज सत्र ३, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र ३, फिल्म स्टडीज सत्र ३, एमपीएड सत्र २, बीपीएड सत्र २, बीफार्म सत्र २, एमफार्म सत्र २, एमएड सत्र २, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र ४, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांना बसणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

दुसरीकडे मुंबईत पुढील 12 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच येत्या 48 तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उपनगरांतही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबई, पालघर जिल्हा, ठाणे महापालिका हद्द, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली इथल्या शाळांना 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अन्य जिल्ह्यांतील तसेच गाव खेड्यातील शाळांबाबत तेथील अधिकाऱ्यांनी तसेच मुख्याध्यापकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.