साप पाहिला की अनेकांचे पाय लटलट कापतात. बऱ्याच लोकांच्या अंगावर काटा येतो. त्यामुळे कधीही साप दिसू नये असं अनेकांना वाटतं. मात्र आपल्या देशात असे ठिकाण आहे जिथे लोक विषारी सापांना हाकलून लावण्याऐवजी गळ्यात गुंडाळून फिरतात. विशेष बाब म्हणजे हे साप त्यांना अजिबात इजा करत नाहीत. तसेच अनेक लोक सापांना प्रसन्न करण्यासाठी धोकादायक स्टंट करतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
झारखंडची राजधानी रांची नजिक असणाऱ्या बुंदू या भागात सापांची जत्रा भरते. भाविक गेल्या शेकडो वर्षांपासून सापांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माँ मनसा देवीला प्रसन्न करण्यासाठी एकत्र जमतात. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेतील धार्मिक विधी सामान्य देव-देवतांच्या पूजेपेक्षा खूप वेगळे आणि विचित्र असतात. या काळात गावकरी गळ्यात विषारी साप घेऊन फिरतात, तसेच या ठिकाणी सापांची जत्रा भरते.
काय आहे पौराणिक कथा?पौराणिक मान्यतेनुसार, रोहिणी नक्षत्राच्या वेळी शेतीची कामे संपल्यानंतर गावकरी विषारी साप शोधण्यासाठी जंगलात जातात. हे लोक जंगलातून साप पकडून आणतात आणि नंतर एक महिना आपल्या घरात ठेवतात. या काळात ते सापांची सेवा करतात आणि नंतर मानसा पूजेदरम्यान हे विषारी साप हातात घेतात. अनेकजण आपल्या शरीरावर सापाला खेळवतात, यामुळे अनेकांना विषारी साप चावतात.
विषाचा परिणाम होत नाहीसापांची देवी माँ मनसा यांच्या शक्तीमुळे विषारी साप गावकऱ्यांचे मित्र बनतात. मात्र हे विषारी साप लोकांना चावल्यानंतरही सापाच्या विषाचा या भक्तांवर कोणताही परिणाम होत नाही. पूजेनंतर गावकरी या विषारी सापांना पुन्हा एकदा जंगलात नेतात आणि नैसर्गिक अधिवासात सोडून देतात.
मानसा देवीच्या पूजेदरम्यान, विषारी साप लोकांना चावतात, याबरोबर गावकरी आपल्या शरीरात लोखंडी सळ्या देखील टोचतात. हे दृष्य भीतीदायक असते. मात्र भक्तांचा असा विश्वास आहे की, या टोकदार सळ्या शरीरात टोचल्या तरी माँ मानसाच्या कृपेमुळे त्यांना अजिबात वेदना होत नाहीत. तसेच गावकरी असेही मानतात की, मानसा देवीची पूजा केल्याने सापाचा शाप दूर होतो. या पूजेदरम्यान विधीनुसार पूजेमध्ये सहभागी होणारे लोक सांपाची काळजीही घेतात. बरेच लोक प्रेक्षक म्हणून या जत्रेला हजर असतात.