जाधववाडी, ता.१८ ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या जयगड गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतीवर दोन वर्षांत ३० किलोव्हॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प सोसायटीवासीयांनी स्वखर्चातून विनाअनुदान तत्वावर यशस्वीपणे उभारला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
चिखली - मोशी, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले. सोसायटीचे सचिव सोमेश्वर त्रिंबके यांच्यासहित संचालक मंडळ व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सांगळे म्हणाले,‘‘सोसायटीने उर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दिशेने गतिमान पाऊल उचलले आहे.
पर्यावरण संवर्धन आणि उर्जाबचतीसाठी उभारलेला प्रकल्प कौतुकास्पद आहे. ’’
सोसायटीचे अध्यक्ष हर्षद पाटील म्हणाले,‘‘आमच्या सोसायटीतील परिवारामधील सर्व सदस्यांचे वेळोवेळी एकमताने पाठबळ आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे सौर प्रकल्पाचे स्वप्न साकारता आले. हरित सोसायटी बनवण्याचे आमचे हे पहिले पाऊल आहे.’’
या प्रकल्पामुळे सोसायटीच्या सामुदायिक देखभाल खर्चात कपात होणार असून विजेवरील खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. शिवाय, सभासदांना स्वच्छ, हरित आणि दीर्घकाल टिकणारी उर्जा उपलब्ध होणार आहे.