Solapur : तानाजी सावंत यांच्या भावाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, भाजपमध्ये जाणार; सोलापुरात शिंदेंना धक्का
esakal August 19, 2025 03:45 PM

माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या भावाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. शिवाजी सावंत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या भूमिकेमुळं शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री यांच्या भावानेच पक्षाला रामराम केल्यानं आता भुवया उंचावल्या आहेत. शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हेसुद्धा भाजप प्रवेश करणार आहेत.

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचं संख्याबळ कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळवीची गणितं सुरू असतानाच शिंदे गटाला शिवाजी सावंत यांच्या भूमिकेमुळं मोठा धक्का बसला आहे. शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली होती. तर दिलीप कोल्हे हे सोलापूरचे माजी उपमहापौर होते.

4 वेळा फाईल परत पाठवलेली, शिरसाटांनी CIDCO अध्यक्ष होताच पहिल्या बैठकीत मंजूर केली; ५ हजार कोटींची जमीन एका कुटुंबाला दिली

पक्षांतर्गत राजकारण, कुरघोडी यामुळे शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. आता येत्या दोन दिवसातच दोघांचाही भाजप प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत अन् जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश होईल अशी माहिती समोर येत आहे. शिवसेनेतील अंतर्गट गटबाजीचा हा फटका पक्षाला बसला असल्याचं म्हटलं जात आहे.

शिवाजी सावंत यांच्या भाजप प्रवेशाबाबत शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांना विचारलं असता त्यांनी भाजप प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिल्या घरी सुखी रहा असा उपरोधिक टोला लगावला. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा संबंधित पदाधिकाऱ्यांचा निर्णय हा वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरणही शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.