निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठीमनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधीच हे दोन्ही पक्ष मुंबईतील दि बेस्ट इम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत (Mumbai Best Society Election Result) एकत्र आलेले आहेत. दरम्यान, आता या निवडणुकीच्या निकालाचा कल समोर आला आहे. ठाकरे बंधूंना या पतपेढीवर एकहाती सत्ता मिळवण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीची होती महाराष्ट्रभर चर्चाबेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत उत्कर्ष पॅनेलची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. त्याआधीच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणूक लढवल्यामुळे या निवडणुकीची महाराष्ट्रभर चर्चा होती. मात्र आता या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. इथे संमिश्र स्वरुपाचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मतमोजणी चालू आहे.
प्रसाद लाढ यांच्या श्रमिक पॅनलची तगडी झुंजबेस्टच्या पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कामगार सेनेसाठी ही निवडणूक एका प्रकारे आपली ताकद कायम असल्याचे दाखवण्याची सर्वोत्तम संधी होती. म्हणूनच या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र ठाकरे यांना एकहाती सत्ता मिळवता येण्याची शक्यता धूसर आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड नेतृत्व करीत असलेल्या महायुतीच्या श्रमिक पॅनेलमुळे ठाकरे बंधूंचं एकहाती सत्तेचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.