Asia Cup 2025 : आशिया कपसाठी भारतीय संघात 7 खेळाडूंना पहिल्यांदाच संधी, निवड समितीचा निर्णय
Tv9 Marathi August 20, 2025 05:45 PM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच यूएईमध्ये सर्व सामने आयोजित करण्यात आले आहेत. दुबई आणि अबुधाबीतील स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहेत. निवड समितीने भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या 15 पैकी 7 खेळाडूंची आशिया कपसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. सूर्याची कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. भारतीय संघातील 15 पैकी पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळणाऱ्या 7 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

ते 7 खेळाडू कोण?

अभिषेक शर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसॅन, हर्षित राणा आणि रिंकु सिंह या खेळाडूंची पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत आणि टी 20i क्रिकेटमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता त्यांच्या पहिल्याच आशिया कप स्पर्धेत ते कसे खेळतात? याकडे निवड समितीचही लक्ष असणार आहे.

संजू-अभिषेकची उल्लेखनीय कामगिरी

संजू आणि अभिषेक ही सलामी जोडी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारताला चांगली सुरुवात करुन देत आहेत. संजूने भारतासाठी 42 टी 20i सामन्यांमध्ये एकूण 861 धावा केल्या आहेत. संजूने या दरम्यान 3 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत. तर अभिषेकने 21 टी 20i सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 2 अर्धशतकांसह एकूण 535 धावा केल्या आहेत.

वरुण चक्रवर्ती

वरुणने 2021 साली टी 20i पदार्पण केलं. वरुणने तेव्हापासून आतापर्यंत 18 सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत.

रिंकु सिंह

अमरावतीच्या जितेश शर्मा याला बॅकअप विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. तसेच शिवम दुबे, हर्षित राणा आणि रिंकु सिंह यांनाही संधी देण्यात आली आहे. रिंकुने गेल्या काही वर्षात स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध केलंय. त्यामुळे रिंकूकडून अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.