स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर अनेकांचे नशीब चमकल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र यामागे प्रचंड मेहनत आणि इच्छा शक्तीची आवश्यकता असते. अशातच झारखंडमधील गिरिडीह येथील सूरज यादवने तरुणांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. सूरज झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता तो उपजिल्हाधिकारी बनला आहे. विशेष म्हणजे सूरज यादव हा स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत अभ्यास करायचा. त्याने रॅपिडो बाईक देखील चालवलेली आहे. सूरजची कहाणी जाणून घेऊयात.
झारखंड लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वी संयुक्त नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला. मुख्य परीक्षा 22 ते 24 जून 2024 दरम्यान झाली होतीस त्यानंतर पात्र उमेदवारांनी मुलाखत दिली होती. तब्बल 10 महिन्यांच्या विलंबानंतर आता निकाल जाहीर झाला आहे. यात सूरजने घवघवीत यश मिळवले आहे.
सूरज यादव एका साध्या कुटुंबात जन्मला, त्याचे वडील गवंडी काम करतात. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. अडचणी असूनही सूरजने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. तो रांचीमध्ये राहून परीक्षेची तयारी करत होता. त्याला घरून पैसेही मिळत नव्हते, त्यामुळे त्याने अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले.
सुरजकडे पुस्तकांसाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो स्विगी आणि रॅपिडोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. सुरुवातीला त्याच्याकडे बाईक नव्हती. त्यावेळी त्याचे मित्र राजेश नायक आणि संदीप मंडल यांनी त्याला आर्थिक मदत केली. या दोघांनी शिष्यवृत्तीच्या पैशातून सूरजला एक जुनी बाईक खरेदी करुन दिली होती. या बाईकच्या मदतीने सूरज रोज 5 तास डिलिव्हरीचे काम करायचा आणि त्यानंतर अभ्यास करायचा.
सूरजच्या यशात त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्याच्या पालकांनी त्याला नेहमी प्रेरित केले. बहिणीने सूरजच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून सर्व कामे केली. सूरजच्या पत्नीनेही त्याला साथ दिली. कुटुंबाचा सामूहिक संघर्ष आणि सहकार्यामुळे सूरज या परीक्षेत यश मिळवू शकला आहे.
सुरज यादवने जेपीएससी परीक्षेत 110 वा क्रमांक मिळवला. तो गेल्या काही वर्षांपासून परीक्षेची तयारी करत होता. हा त्याला दुसरा प्रयत्न होती, यात त्याने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.