स्तनपान वाढीस चालना
७२ टक्के मातांकडून जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यातील मातांकडून नवजात बाळांना स्तनपान करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. राज्यात ७१.९ टक्के माता जन्मानंतर एका तासाच्या आत आपल्या बाळाला स्तनपान करतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-पाच (एनएफएचएस) च्या आकडेवारीवरून याचा अंदाज येतो.
एनएफएचएस-चार सर्वेच्या वेळी ही सरासरी ५३ टक्के होती. यापैकी, ७८ टक्क्यांहून अधिक महिलांनी सहा महिने केवळ बाळाला स्तनपान केले. जे राष्ट्रीय सरासरी ६३.७ टक्के पेक्षा चांगले आहे. गेल्या पाच वर्षांत आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या १९ टक्क्यांनी वाढली आहे.
नवजात बाळाला होणारे फायदे
रोग प्रतिकारकशक्ती चांगली होते
संक्रमण कमी होते
लहान मुलांची आयक्यू पातळी सुधारते
श्वसनासंबंधी आजार कमी होतात
सरकारने सुरू केली मोहिम
अनेकदा नोकरदार महिला आपल्या नवजात बालकांना स्तनपान देणे टाळतात. शहरी भागात ही प्रवृत्ती अधिक दिसून येते. पण, बाळांसाठी आईचे दूध महत्वाचे आहे. यासाठी सरकारने बेबी फ्रेंडली हॉस्पिटल नावाचा उपक्रम सुरू केला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
स्तनपानाच्या बाबतीत ग्रामीण महिला पुढे
एनएफएचएस-सहाच्या अहवालानुसार, राज्यातील ग्रामीण भागातील महिला त्यांच्या नवजात बालकांना स्तनपान देण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. शहरी भागातील ६९ टक्के आणि ग्रामीण भागातील ७३ टक्के मातांनी प्रसूतीच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू केले. सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानाचा दर ग्रामीण भागात ८० आणि शहरी भागात ७५ टक्के आहे.
म्हणूनच शहरी भागातील महिला मागे
शहरी भागात नोकरदार महिलांची संख्या खूप जास्त आहे. त्यांना काहीच महिने प्रसूती रजा मिळते. त्यानंतर, त्यांना बाळाला स्तनपान करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही. आरोग्य तज्ञ म्हणतात की, मुलांच्या आणि मातांच्या पोषणविषयक गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज आहे.
बाळांसाठी आईचे दूध आवश्यक
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे म्हणाले की, जन्मानंतर सहा महिने फक्त स्तनपान केल्याने बाळांमध्ये अतिसार, मलेरिया, कुपोषण, मधुमेहाचा धोका कमी होतो.
ग्राफीक्स-
महिला ७८ टक्के सहा महिने स्तनपान
राष्ट्रीय पातळीवर ६३.७ टक्के
राज्यात पाच वर्षांत १९ टक्के वाढ