केळव्याची निलाक्षी हाडळ महाराष्ट्र पोलिस दलात दाखल
पालघर, ता. १९ (बातमीदार) ः केळवे येथील निलाक्षी हाडळ अथक प्रयत्नांतून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाली आहे. घरची परिस्थिती खडतर असताना निलाक्षीने जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. याबद्दल तिचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.
आदिवासी कुटुंबातील निलाक्षी हाडळच्या आई-वडिल मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्याचबरोबर मुलांना शिक्षण सुद्धा दिले. परंतु, वर्षभरापूर्वी निलाक्षीच्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला.
त्यातून तिने सावरत पोलिस प्रशिक्षण सुरू केले आणि अनेक अडचणींवर मात करत खडतर प्रवास सुरु ठेवला व तिने तिचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निलाक्षीने नऊ महिने पासिंग परेड देखील पूर्ण केली. अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले असून निलाक्षी महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाली आहे. निलाक्षी हाडळचे केळवे गावचे सरपंच संदीप किनी व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
फोटो
नीलाक्षी हाडळ महाराष्ट्र पोलीस दलात