सजावटीची 'थीम' ठरवून आरास करण्यास पसंती
esakal August 21, 2025 11:45 AM

पिंपरी, ता. २० ः बाजारातून तयार मखर किंवा मंदिर आणून त्यामध्ये गणपतीची स्थापना करण्यापेक्षा एखादी संकल्पना घेऊन त्यानुसार घरीच गणपतीची आरास करण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून पडला आहे. घरीच आरास कशी करायची याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ पाहून आपल्या घरी येणाऱ्या गणरायासाठी हटके आरास करावी अशा विचारातून थीम ठरवून आरास केली जात आहे. अगदी गणेश मूर्तीपासून ते रोशणाईपर्यंतची सर्व खरेदी थीमनुसार करण्याकडे नागरिकांचा कल आहे.
गणपतीची आरास म्हणजे फक्त मखर किंवा मंदिर ही संकल्पना आता मागे पडली आहे. घरगुती गणेशोत्सवातही छोटासा देखावा करण्याला गणेशभक्त पसंती देत आहेत. त्यामध्ये विविध मंदिरे साकारली जात आहेत. यासाठी बाजारातून तयार मंदिरे किंवा मखर आणून त्यातही अनेक बदल केले जात आहेत. तसेच घरातीलच पुठ्ठा, कागद, रद्दी याचा वापर करून पर्यावरणपूरक आरास केली जात आहे. मात्र, ही आरास आकर्षक बनविण्यासाठी आवश्यक सजावट साहित्याला मात्र सध्या मोठी मागणी आहे.

कृत्रिम फुलांच्या माळा व झुंबर
गणेशाच्या मखराला अधिक आकर्षक करण्यासाठी सध्या कृत्रिम फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, गुलाब, अस्टर या फुलांसोबतच परदेशी अनेक फुलांच्या माळा तसेच सुट्टी फुले सध्या बाजारात मिळत आहेत. या फुलांच्या माळांची किंमत ४० रुपये जोडी पासून ते ८०० रुपये जोडी एवढी आहे. यासोबतच कापडाची फुले वापरून बनविलेल्या माळाही बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत ५० रुपयांपासून पुढे आहे. ही फुले कल्पकतेने वापरून नागरिक सजावट करण्यास प्राधान्य देत आहेत. फुलांच्या माळांप्रमाणेच नक्षीदार झुंबर व तोरणेही बाजारात दाखल झाली असून नकली फुले, मोती, काच यांचा यामध्ये वापर केलेला दिसून येत आहे.

सजावटीचे वैविध्यपूर्ण साहित्य
यावर्षी गणेशोत्सवामध्ये पारंपरिक सजावटीच्या साहित्यासह फिक्या रंगाच्या फुलांना अधिक मागणी आहे. तसेच लहान दिवे, अष्टविनायक व देवी-देवतांचे चित्रे असलेले कटआउट, कापडाचे कमळ, मण्यांची तोरणे, गणपतीचे कापडी आसन यामध्येही असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. फुलांच्या माळांशिवाय लाकूड, मोती यांपासून बनविलेल्या माळादेखील बाजारात दाखल झाल्या आहेत. घरगुती देखाव्यांमध्ये वारी, महाराष्ट्राची लोकधारा, ग्रामीण संस्कृती, मंगळागौर यांची आरास केली जात आहे. यासाठी आवश्यक लहान लाकडी बाहुल्यांनाही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

‘‘आमच्याकडे तयार मखरांसोबतच मखर बनविण्यासाठी कटआउट, रिंग आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. सध्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाला आपली आरास हटके असावी असे वाटते. त्यामुळे रील्स किंवा व्हिडिओ पाहून नागरिक त्यानुसार सजावटीच्या साहित्याची मागणी करीत आहेत.’’
- हार्दिक बाघमार, सजावट विक्रेता, चिंचवडगाव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.