उत्सव काळात वीजचोरी केल्यास कारवाई
खारघर, ता. २० (बातमीदार) : गणेशोत्सवाला काहीच दिवस बाकी असून, गणेश मंडळांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या मंडळांना वीजपुरवठा सोयीस्कर व्हावा या दृष्टीने महावितरणने उपकेंद्रामध्ये सुविधा सुरु केली आहे. गणेश मंडळांना घरगुती दरात ही वीजजोडणी मिळणार आहे. तसेच उत्सव काळात विनापरवाना वीज चोरी करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत जवळपास तीनशेहून अधिक गणेश मंडळ असून गणेश उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक गणेश मंडळांकडून सभामंडप, देखावे व आरास तयार करण्यात आली आहे. दरम्यान, महावितरणकडून गणेश मंडळांना वीज जोडणी देण्यासाठी सुविधा सुरू केली आहे. घरगुती दरात वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी मंडळाने महावितरणच्या विभाग निहाय उपकेंद्रामध्ये गणेशोत्सवापूर्वी तीन ते चार दिवस आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
वीज पुरवठा जोडणीसाठी अर्ज देताना गणेशोत्सव किती दिवसाचा आहे, उत्सवादरम्यान केली जाणारी विद्युत रोषणाई त्यानुसार किती व्हॅट वीज वापरली जाईल. त्यानुसार वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. वीज पुरवठा घेताना काही अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. तर, उत्सव मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणताही धोका होवू नये यासाठी मंडळाने काळजी घेणे आवश्यक आहे.
भक्तांना धोका
महावितरणच्या वायरमनकडे गणेश उत्सव वीजजोडणीसंदर्भात विचारणा केली असता, काही मंडळाकडून वीज चोरी करून उत्सव साजरा केले जातात. वीज जोडणी करताना जमिनीत अर्थिंग वायरिंग योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे गणेश भक्तांना धोका असतो. महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी केल्यास संबंधित विभागातील कर्मचाऱ्याकडून काळजी घेतली जाते.
गणेश मंडळांना वीजपुरवठा जोडणीसाठी विभाग निहाय उपकेंद्रात उत्सव सुरू होण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी अर्ज सादर केल्यास अधिकाऱ्याकडून पाहणी करून तात्काळ वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गणेश मंडळाला कमी दराने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे अधिकृत वीज पुरवठा घेऊन साजरा करणे आवश्यक आहे. तसेच, वीज चोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता, महावितरण
अनामत रक्कम दहा हजार
गणेश मंडळाने विभागनिहाय उपकेंद्रात वीज पुरवठासाठी अर्ज केल्यास तात्काळ जोडणी दिली जाणार आहे. वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मंडळाकडून उत्सव काळात केल्या जाणाऱ्या विद्युत रोषणाईनुसार दोन, चार किंवा पाच किलोवॅटनुसार वीज पुरवठा उपलब्ध करून दिले जाणार आहे. गणेशोत्सव हे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे वीज दर देखील कमी असणार आहे. अनामत रक्कम आठ ते दहा हजारच्या आत असणार आहे.