Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू
Saam TV August 21, 2025 11:45 AM
  • सिंहगड रोडवरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल काम अंतिम टप्प्यात

  • राजाराम पूल व विठ्ठलवाडी ते फन टाईम पूल आधीच वाहतुकीस खुला

  • काही सुरक्षा व प्रकाशयोजनांची कामे सुरू, पावसामुळे थोडा विलंब

  • पूल सुरू झाल्यानंतर पुणेकरांना वाहतूककोंडीपासून मोठा दिलासा

पुणेकरांच्या वाहतूक समस्येचा मोठा भार कमी करणाऱ्या सिंहगड रोडवरील उड्डाणपूल प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती पुणे महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि विशेषतः सिंहगड रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून हाती घेतलेला उड्डाणपूल प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास येत असून, प्रशासनाने लवकरच तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम सिनेमा दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यांतील पूल नागरिकांसाठी आधीच खुला करण्यात आलेला आहे. राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा आणि विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा दरम्यानचा २१२० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाल्याने काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी झाली आहे. परंतु गर्दीच्या वेळी अजूनही इनामदार चौक, मातोश्री चौक आणि गोयलगंगा चौक परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे.

Pune Ganeshotsav: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी २५ तारखेला शमणार, पोलिस आयुक्तांची ग्वाही

या पार्श्वभूमीवर, तिसऱ्या टप्प्यातील गोयलगंगा चौक ते इनामदार चौक या १५४० मीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे काम आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. पुलाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. त्यामध्ये थर्माप्लास्टिक पेंटिंग, साईन बोर्ड्स, अपघात टाळण्यासाठी आवश्यक हजार्ड मार्किंग बोर्ड्स आणि जंक्शन सुधारणा यांसारखी महत्त्वाची सुरक्षा संबंधित कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Pune News: पुणेकरांना सर्दी, खोकल्यानं वाढला 'ताप', साथीच्या आजाराचे रूग्ण वाढले, काय घ्याल काळजी?

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, उड्डाणपूल सुरू करण्यापूर्वी वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाशी समन्वय साधून काही उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. इनामदार चौक, राजाराम चौक आणि मातोश्री चौक या ठिकाणी विशेष लक्ष देत वाहतुकीचा वेग आणि प्रवाह सुरळीत राहील याची काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर पुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था राहावी यासाठी विद्युत पोल कार्यान्वित करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे.

Pune :"तो" नामांकित पब आणखी अडचणीत! "ड्राय डे'ला मद्यविक्री, पोलिसांना माहिती देणाऱ्याला शिवीगाळ

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काही कामांना अडथळे येत असले तरी प्रशासनाने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर सिंहगड रोडवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल, तसेच अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Pune :"तो" नामांकित पब आणखी अडचणीत! "ड्राय डे'ला मद्यविक्री, पोलिसांना माहिती देणाऱ्याला शिवीगाळ

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि प्रवासी याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. कारण, दररोज हजारो वाहनचालकांना तासन्तास वाहतुकीत अडकून बसावे लागते. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल सुरू झाल्यास सिंहगड रस्त्यावरचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुणेकरांना या बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचा लाभ मिळणार यात शंका नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.