जेजुरी, ता. २० ः जेजुरी जवळील कोळविहिरे (ता. पुरंदर) हद्दीतील किर्लोस्कर फेरस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने परिसरातील २५ शाळेतील २५०० विद्यार्थ्यांना दप्तरे व वह्या वाटप करण्यात आले. गेल्या आठ दिवसांत पाच टप्प्यांमध्ये कंपनी व्यवस्थापनाने हे वाटप केले. कंपनीचे प्रमुख सत्यमुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आल्याचे सीएसआर विभागाचे प्रवीण पवार यांनी सांगितले.
कोळविहिरे येथील महर्षी वाल्मिक विद्यालय अंतर्गत सात शाळेतील तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मिनाक्षी झगडे, उपसरपंच विमल नाणेकर, किर्लोस्कर कंपनीचे प्रकल्प प्रमुख प्रमोद दोडे, एच.आर. प्रमुख जब्बार पठाण, माजी सरपंच महेश खैरे, विलासआबा घाटे, ॲड. दशरथ घोरपडे, मुख्याध्यापक अशोक चव्हाण, सोसायटी अध्यक्ष सुरेश झगडे, पोलिस पाटील सोनाली कुदळे, धाकु सोनवणे, तुषार झगडे आदी उपस्थित होते. कोळविहिरे परिसरातील घाटेवाडी, भोरवाडी, कुदळेवाडी, घोरपडेवाडी, खोमणेमळा येथील सुमारे तीनशे विदयार्थ्यांनाही वाटप करण्यात आले.
शैक्षणिक कार्यासाठी मदत करण्याचे कंपनीचे धोरण कौतुकास्पद असल्याचे सरपंच मिनाक्षी झगडे यांनी यावेळी सांगितले. ॲड. दशरथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. वैशाली हाडके यांनी सुत्रसंचालन केले. सोपान जगदाळे यांनी आभार मानले.
नाझरे कडेपठार (ता. पुरंदर) येथे नाझरे सुपे, नाझरे कडेपठार, खैरेवाडी येथील चारशे विद्यार्थ्यांना वाटप झाले. कंपनीचे प्रमुख सत्यमुर्ती व प्रभाकर खंदारे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. जेजुरी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालयाच्या जेजुरी, धालेवाडी, जुनी जेजुरी, दवणेमळा येथील शाळांमध्ये आठशे विद्यार्थ्यांना कंपनीचे श्रीनिवासन राव, धनंजय शितोळे, सागर झोपे यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. मावडी पिंपरी येथे मावडी पिंपरी विद्यालय, पिंपरी, हंबीरवाडी, रोमनवाडी, भगतवस्ती येथील तीनशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशाला, भोसलेवाडी, जगतापवस्ती, रानमळा, प्राथमिक शाळा, कोथळे येथे सहाशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.