नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत ‘नाफेड’ने राज्यातील २५ केंद्रांवर एक लाख ४३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी पूर्ण केली आहे. उद्दिष्टपूर्ती झाल्याचे सांगत आता यापुढे कांदा खरेदी करण्यात येणार नसल्याचे ‘नाफेड’ने स्पष्ट केले आहे.
भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ (नाफेड) व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या दोन्ही संस्था यंदा तीन लाख टन कांद्याची खरेदी करणार आहेत. ‘नाफेड’मार्फत दीड लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ‘नाफेड’ने राज्यातील २५ खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी पुढील सात दिवसांचा दर निश्चित होतो.
सुरवातीला १,३५० रुपयांप्रमाणे त्यानंतर अकराशे रुपये आणि शेवटी ९५० रुपये प्रतिक्विंटल या दराने नाफेडने खरेदी केली आहे. अहिल्यानगर व पुणे येथील खरेदी केंद्र वगळता उर्वरित बहुतांश केंद्रे नाशिक जिल्ह्यात आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवड, देवळा, निफाड, दिंडोरी, कळवण, नांदगाव या ठिकाणच्या केंद्रांवर कांद्याची खरेदी करण्यात आल्याचे ‘नाफेड’ने सांगितले.
आता बांगलादेशाचाच आधार
‘नाफेड’ची खरेदी होणार नसल्याने शेतकऱ्यांना आता कांद्याचे दर वाढण्यासाठी बांगलादेशातील निर्यातीवर अवलंबून राहावे लागेल. मात्र, बांगलादेश सरकारने अचानकपणे भारतीय कांद्याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. बनावट पद्धतीचा माल पाठविण्यात येत असल्याची शंका तेथील सरकारला वाटू लागल्याने त्यांनी तातडीने ही निर्यात थांबविल्याचे समजते. याविषयी स्थानिक व्यापाऱ्यांनी दुजोरा दिलेला असला तरी बांगलादेश सरकारची ही अंतर्गत बाब असल्यामुळे निर्यातीवर कुठल्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. एक-दोन दिवसांत निर्यात पुन्हा सुरळीत होईल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
आनंदाची बातमी! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांगांचे १२८ गुरुजी कायम'; न्यायालयाचे निर्देश; दीड तपाच्या लढ्याला यशबांगलादेशात तपासणी का?
भारतातून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यासोबत इतरही वस्तूची निर्यात होत असल्याचा संशय येथील सरकारला आल्याने सोमवारी (ता. १८) भारतीय कंटनेरची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी, निर्यात काही काळासाठी ठप्प झाली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे कंटेनर रवाना होतील. श्रीलंकेकडून भारतीय कांद्यावर आयातशुल्क लागू करण्यात येणार असल्याचे समजते.