…तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, कीर्तनकार भंडारेंची बाळासाहेब थोरातांना थेट धमकी!
Tv9 Marathi August 21, 2025 05:45 AM

Balasaheb Thorat : कीर्तनकर संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिली आहे. आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असं भंडारे यांनी म्हटलंय. संगनेर तालुक्यातील घुलेवाडी या गावात संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनामध्ये भंडारी यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा थोरात समर्थकांचा दावा आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी आमच्यावर विनाकारण हल्ला केला, असं भंडारे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता भंडारे यांनी गोडसेचे नाव घेत थोरातांना दिलेल्या धमकीची सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये संग्रामबापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तन चालू असताना त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते, असे मत थोरात यांच्या समर्थकांचे आहे. त्यानंतर थोरात यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

संग्रामबापू गायकवाड यांनी नेमकी काय धमकी दिली?

त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्यानंतर संग्रामबापू गायकवाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी थोरात यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना गोडसेचे नाव घेत धमकी दिलीय. ‘संगमनेरमधील घुलेवाडी येथील कीर्तनात दोन मनोरुग्ण आले होते. त्यात थोरात यांचा एक पीए होता. दुसरा पीएचा मामा होता. यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलला फाडलं याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहे थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल,’ अशी थेट धमकीच संग्रामबापू भंडारे यांनी दिली.

थोरात यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

तर भंडारे यांच्या या धमकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहशत निर्माण करण्याचा, माणसा-माणसांत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगमनेर तालुक्याची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगमनेर तालुका हा सुजलाम-सुफलाम आहे. शांततेने हा तालुका राहतो. या तुलाक्याचा विकास कसा थांबवता येईल, यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. भंडारे यांनी दिलेली धमकी याच प्रयत्नांचा एक भाग आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिलीय.

थोरात समर्थकांचे आंदोलन, कारवाईची मागणी

दरम्यान, भंडारे हे कीर्तनकार असून भडकाऊ विधानं करत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप करत थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवदेन दिले असून याबाबतीत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केलीय. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.