पीएमआरडीएच्या सदनिकांचे ७५ टक्के कामे पूर्ण
esakal August 21, 2025 06:45 AM

पिंपरी, ता. २० : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने मोशी सेक्टर १२ येथे उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात कामाला उशीर होणार असल्याचे चित्र आहे.
पीएमआरडीएच्या वतीने सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सहा हजार ४५२ गृहप्रकल्पाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ८८३ सदनिका उभारण्यात आलेल्या होत्या. गृहप्रकल्प ३, ४, ५ या प्रकल्पाखालील ११.६३ हेक्टर क्षेत्र असणार आहे. या प्रकल्पात एकूण सदनिका ६ हजार ४५२ उभारण्यात येणार आहेत. अल्प, मध्यम व उच्च गटातील नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. या सदनिकांबरोबरच ८३ कमर्शिअल दुकाने उभारण्यात येणार आहेत. वन बीएचके सदनिकेची मागणी अधिकची असल्याने वन बीएचके सदनिका अधिक उभारण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी ७३० कोटी रुपये खर्च येणार आहे. २०२३ पासून या कामाला सुरुवात झाली आहे.
सध्या या प्रकल्पातील ७५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ३४ इमारतींमधील फिनिशिंगची कामे सुरू आहेत. तर, १३ इमारतींच्या कामाला उशिरा सुरुवात झाली. या इमारतींच्या कामाचा वेग तुलनेने कमी आहे. लवकरच या कामांनाही गती देऊन नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिसेंबरचा मुहूर्त लांबणार
गृहप्रकल्पातील १३ इमारतींच्या कामांना उशिरा सुरुवात झाली आहे. तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास कामांना उशीर होत आहे. त्यामुळे या इमारती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डिसेंबर २०२५ पर्यंत होते. मात्र, या वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे डिसेंबरचा मुहूर्त लांबणीवर पडून ही वेळ पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

‘‘सेक्टर १२ येथील ४७ इमारतींमधील सहा हजार ४५२ सदनिकांचे कामे पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र, काही इमारतींचे काम उशिरा सुरू झाल्यामुळे काम पूर्ण होण्याची मुदत वाढू शकते.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.