Pune Railway Update : पुण्यातून रेल्वेसेवा सुरळीत, प्रवाशांना दिलासा
esakal August 21, 2025 05:45 PM

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, बुधवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रेल्वेसेवा नियमितपणे सुरू झाली. मात्र, ‘पीएमपी’च्या ८० बस ब्रेकडाउन झाल्याने दिवसभरात सुमारे २०० हून अधिक बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या शिवनेरी बसना सुमारे दीड ते दोन तास उशीर झाला.

मुंबईतील पाऊस मंगळवारी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने रात्री दोनपासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने रेल्वेची वाहतूक सुरू केली. मात्र, सोमवारीच डेक्कन, इंद्रायणीसारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्याने पाऊस कमी झाला, तरी या गाड्या धावल्या नाहीत. दोन दिवसांत पुणे-मुंबई दरम्यानच्या १२ रेल्वे रद्द झाल्या; तर चार गाड्यांचा मार्ग बदलला होता. चार गाड्या मुंबईला न जाता पुण्यापर्यंतच धावल्या. मात्र, बुधवारी अनेक गाड्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने धावल्या.

शिवनेरीला फटका

पुणे-मुंबई मार्गावर दररोज सुमारे ५० हून अधिक शिवनेरी बस धावतात. मुंबईत पाऊस असल्याने या गाड्यांना पुण्याला पोहोचण्यास सुमारे दीड ते दोन तास उशीर झाला. स्वारगेट गाठण्यास उशीर झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

‘पीएमपी’ बस ब्रेकडाउन

दोन दिवसांत ‘पीएमपी’च्या ८० बस ब्रेकडाउन झाल्या. यात ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या १० व ठेकेदारांच्या ७० गाड्यांचा समावेश आहे. ८० बस ब्रेकडाउन झाल्याने सुमारे २०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. याचा फटका किमान १० ते १५ हजार प्रवाशांना बसला. बुधवारपर्यंत ब्रेकडाउन झालेल्या बस प्रवासी सेवेत दाखल झालेल्या नव्हत्या.

मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुण्याहून रेल्वेची वाहतूक सुरू झाली. बुधवारी रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरळीत होते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.