मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील नांदगाव फाटा-पाडाळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या रस्त्याची दुरवस्था पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि पत्रकारांनी एकदा प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केले आहे.
२०२१–२२ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांना रस्ता रुंद व चांगला होणार याचा आनंद झाला होता. मात्र, ठेकेदाराने थातुरमातूर काम करून दोन वर्षांपूर्वी रस्ता अपूर्ण सोडला आणि त्यानंतर परत आलाच नाही. २०२३पासून ग्रामस्थांनी ठाणे व मुरबाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांत तक्रारी व निवेदने दिली; पण त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप मुरबाडे यांनी केला.
सध्या या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, वाहनचालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लोकशाही राज्यात सुशिक्षित अधिकारी व कर्मचारी नेमलेले असतानाही त्यांना जबाबदारीची जाणीव नाही. फक्त निधी मंजूर, गाजावाजा आणि नंतर कामाचा दर्जा घसरतो. सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?, असा सवाल मुरबाडे यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, जनतेनेच एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे; अन्यथा परिस्थिती बदलणार नाही.