माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर
esakal August 22, 2025 05:45 AM
  • बीसीसीआयने आशिया कप २०२५ साठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात श्रेयस अय्यरचा समावेश नव्हता.

  • राखीव खेळाडूंतही श्रेयसला स्थान न दिल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.

  • पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपये खर्चून श्रेयसला खरेदी करून कर्णधार केले आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवले.

Shreyas Iyer’s father expressed disappointment: आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघ जाहीर केला, परंतु त्यात श्रेयस अय्यरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी ५ राखीव खेळाडूंचीही नावे जाहीर केली आणि त्यातही श्रेयसचे नाव नव्हते. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने कामगिरी करूनही श्रेयसला संधी मिळत नसल्याने अनेकांनी टीका केली, तर अय्यरच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आयपीएल २०२५ पूर्वी पंजाब किंग्सने श्रेसयला २६.७५ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले आणि कर्णधारपदही सोपवले. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने फायनल गाठली. तरीही त्याला संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर आहे. ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयसच्या प्रश्नावर म्हटले की, श्रेयसला संघात घ्यायचे झाल्यास, कुणाला तो रिप्लेस करू शकतो? ही त्याची चूक नाही आणि आमचीही नाही. सध्याच्या घडीला आम्ही सर्वोत्तम १५ खेळाडू निवडले आहेत. त्यामुळे श्रेयसला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल.

श्रेयसने आयपीएल २०२५ मध्ये १७ सामन्यांत ५०.३३ च्या सरासरीने व १७५.७०च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या. श्रेयसला पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघातून वगळण्यावर त्याचे वडील संतोष अय्यर यांनी नाराजी व्यक्त केली.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले, "श्रेयसने अजून काय करावं जेणेकरून त्याला भारतीय ट्वेंटी-२० संघात स्थान मिळेल, हे मला समजत नाहीए. दिल्ली कॅपिटल्सपासून कोलकाता नाईट रायडर्सपर्यंत आणि आता पंजाब किंग्जसाठी, तो सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय. शिवाय कर्णधार म्हणूनही त्याने मोठी कामगिरी केली आहे.''

ते पुढे म्हणाले, ''२०२४ मध्ये त्याने केकेआरला IPL विजेतेपद मिळवून दिलं आणि यंदा पंजाब किंग्जला फायनलमध्ये नेलं. मी असं म्हणत नाही की त्याला भारताचा कर्णधार करा, पण निदान संघात तरी घ्या. त्याला संघाबाहेर ठेवलं तरीही तो कधीच नाराजी चेहऱ्यावर दाखवत नाही. फक्त इतकंच म्हणतो – 'मेरा नसीब है… आता काय करू शकतो?' तो नेहमीच शांत, संयमी असतो. तो कुणावर दोषारोप करत नाही, पण मनातून मात्र त्याला दुःख होत असेल."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.