Malegaon News : मालेगावात बनावट मतदारांचा मुद्दा पेटला; १६ हजार बोगस नावे असल्याचा आरोप
esakal August 22, 2025 07:45 AM

मालेगाव: मालेगाव मतदार संघात बनावट मतदारांचा विषय पुढे येतो आहे. साधारण १६ हजारावर बोगस मतदारांची नावे समाविष्ट केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्याविरोधात आज इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंम्ब्ली पक्ष तसेच बारा बलुतेदार संघटनेतर्फे वेगवेगळी निवेदन देण्यात आली. आगामी निवडणूकीच्या तोंडावर सोळा हजार बनावट मतदारांचा प्रश्न पुढे आल्याने येथील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबलीचे निवेदन मालेगाव मतदारसंघात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारयादीत बोगस मतदान नोंदविण्यात आले. येथे सहा वॉर्डात साडेसोळा हजार बोगस मतदानाची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात चौकशी करुन दोषी बीएलओ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र या पक्षाचे अध्यक्ष खतीब नवीद यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह तहसीलदार विशाल सोनवणे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सहा वॉर्डातील सर्व बीएलओंची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. निवेदनावर खतीब नवीद, फिरोज खान, अस्लम अन्सारी, रफीक भुऱ्या, सिकंदर पहिलवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बारा बलुतेदार संघटनेचे निवेदन

येथील मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळी बारा बलुतेदार संघटनेचे बंडुकाका बच्छाव व माजी आमदार आसिफ शेख, दीपाली वारुळे यांनी मृत व एकापेक्षा अधिक मतदार याद्यांमध्ये नावे असल्याची तक्रार केली होती. ती नावे काढावीत अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु अद्यापही ती नावे वगळण्यात आली नाहीत. महानगरपालिका निवडणुकीपुर्वी ती नावे वगळावीत अशी मागणी माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी केली आहे. आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेत निवेदन सादर केले.

मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघात बरीच नावे बोगस व मृत व्यक्तींची आहेत. ती नावे वगळावीत. यासाठी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी बोगस मतदार असल्यासंदर्भात औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे. दोन्ही मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ दिसून येतो. आगामी निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी. बोगस मतदान कमी करावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. निवेदनावर गुलाब पगारे, निखिल पवार, मदन गायकवाड, दिपक भोसले, सोमण्णा गवळी, प्रविण सोनवणे, निसार शेख, राजु आहिरे, तुषार ढिवरे, सुरेश गवळी, युवा गिते, संजय खरताळे, मनोज पवार, राजेंद्र शेलार, विवेक वारुळे, प्रताप पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १६, १७, १८, १९, २०, २१ या सहा वार्डातील १६ हजार ४१५ मते बोगस वाढविण्यात आली होती. त्यांनी मतदान केले आहे. या वॉर्डातील बिएलओंनी मतदारांकडे रहिवासी पुरावा न घेता बोगस मते वाढविली आहेत. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत हा प्रकार पुन्हा होवू शकतो. त्यामुळे निवडणूक विभागाने याकडे लक्ष द्यावे. अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करावीत.

- खतीब नवीद, अध्यक्ष, इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.