मंत्र्याने मनोज जरांगेंच्या कानात काय सांगितले? कुणाला आले टेन्शन? मोर्चापूर्वीच खळबळ?
Tv9 Marathi August 22, 2025 07:45 AM

मला सरकार म्हणाले की, तुझ्या अंगाचे कातडे काढून दे, मी तुमच्या समाजाला आरक्षण देतो, तर मी एका सेकंदात अंगाचे कातडे काढून देईल असे मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. येत्या २९ ऑगस्टला आपण मुंबईत येऊन मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. कोण आडवे येते तर येऊ द्या असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर मधील झाल्टा गावात प्रत्यक्ष गाठी भेटीसाठी घेत आहेत. २९ ऑगस्टच्या मुंबई मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हा दौरा करीत आहेत.

शेवटच्या उपोषणाला मुख्यमंत्री यांच्यावतीने सुरेश धस आले होते, आणि मला म्हणाले होते आताच सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मी तीन महिन्यांच्या वेळ दिला होता. त्यामुळे मुंबईकरांनी सांगावे, चूक सरकारची आहे का आमची ? ५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत.आता सरकारला काय पुरावा पाहिजे. आता प्रश्न आहे, आम्ही तुमचे का ऐकावे ? आणि आम्ही मुबई मध्ये का येऊ नये ? यांना वेळ द्यायचा तरी किती, प्रत्येक वेळी वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटसाठी वेळ दिला आहे.काय व्हायचे ते होऊ द्या मी मुबईमध्ये घुसणार. आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही,आमचे आम्हाला आरक्षण द्या असेही ते यावेळी म्हणाले.

आता आपण ठरवायचे लेकरांचे वाटोळे होऊ द्यायचे का आरक्षण आणायचे ? बीड जिल्ह्याच्या एका माजी मंत्र्यांच्या मुलाचा पेपर होता पण तो दोन टक्क्यांनी हुकला, आरक्षण श्रीमंत गरीब बघत नाही असे जरांगे यावेळी म्हणाले. सामना आणि संघर्ष जसा असेल तसा करावा लागतो. मराठ्यांवर गुलाल उधलायची हीच वेळ आहे. मराठ्यांनी सरकारला शांततेत समजून सांगितले. माझ्या समाजाला कोणी वाईट बोलले तर घोडे लावणार. सरकार उलट्या खोपडीचे असेल तर मी पण उलट्या खोपडीचा आहे.त्या येवल्यावाल्यानी समजून घेतले पाहिजे मराठे आरक्षणात गेले अशी भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे यांनी टीका केली.

ज्या दिवशी आपण संयम आणि इमानदारीच्या यादीत येऊ, त्यावेळी मराठ्यांकडे कोणी वाकडे बघणार नाही. वेळ अजून हातातील गेली नाही, संधीचे सोने करा. मी सर्व पक्षातील लोकांना, आमदार, खासदार यांना विनंती करतो, माझ्या लेकरांच्या पाठीवर हात ठेवा, सर्वांना आवाहन आहे आणि समाजाच्या लेकरांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर रस्त्यावर फिरू देणार नाही अशा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.

मुंबईला येण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ज्या मराठ्यांचा नंबर आहेत त्यांना फोन करा. तुमचे आमदार खासदार नेते यांना फोन करा मुंबईला चला आणि तो नाही आला तर तो पडलाच समजा. छत्रपती संभाजीनगर मधील डॉक्टर, शिक्षक यांच्या गाड्या मुंबईला जाण्यासाठी बाहेर काढाव्या. यावेळी मुंबई मध्ये प्रचंड लोक येणार आहेत आणि मी त्याचा आढावा घेतला आहे.

मला एका मंत्र्याने सांगितले…

सर्व मंत्री आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, जो माझ्या समाजासाठी सभ्य वागतो मी त्यांच्यासोबत सभ्य वागतो.मराठ्यांनी फक्त शांत रहा, तुम्हाला आरक्षण भेटते. मला एका मंत्र्याने सांगितले,त्याला फूल टेन्शन आले आहे असे सांगत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, लोकशाही मार्गाने मुंबईत येत आहे, २७ तारखेच्या आत मागण्या पूर्ण करा, एकदा अंतरवाली सोडली तर माघार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आमचं काम आता सरकारपाशी…

माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्या नाहीत, आमच्या मागण्या राज्य सरकारकडे आहेत. शिंदे समितीवर आमची नाराजीच नाही आणि शिंदे समितीबाबत आमचं काही म्हणणं नाही. शिंदे समितीने ५८ लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आहे.आमचं काम हे शिंदे समितीपाशी गुंतलं नाही तर आता सरकारपाशी गुंतलेला आहे, कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे हा जीआर सरकार आता काढू शकते, तुम्हाला आधार आहे.शिंदे समितीने तातडीने हैदराबाद गॅजेटचा अहवाल देणे गरजेचे आहे, सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट याचाही अहवाल शिंदे समितीने सरकारला देणे गरजेचे आहे.आम्हाला शंका आहे शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडवणीस देऊ देत नाहीत असाही आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला आहे.

आमच्या हाताच्या नोंदी असतानाही ओबीसी आरक्षण दिले जात नाहीत. आम्ही शिंदे समितीचे आणि कायम कौतुक केलेले आहे.व्हॅलिडीटी कोण देत नाही, संजय शिरसाठ यांच्या मंत्रालयातील अधिकारी देत नाहीत,ज्या नोंदी सापडलात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही? महसूल विभागाचे भाऊ खुळे साहेबांचे मंत्रालय आहे ते देत नाहीत मग हे जाणून-बुजून चालू आहे.शिंदे समिती नोंदणी शोधत होती शोधत नसेल तर त्यांनी शोधावं एवढं सांगण्यासाठी आम्ही तिथे जावा का ? त्या शिंदे समितीला मुदत वाढ दिली परंतु ऑफिसच नाही. कुठे काम करायचे त्यांनी, एखाद्या जातीच्या लेकराला किती वेड्यात काढावे सरकारने.देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला वाटतं का मराठे वेडे आहेत ?, तुम्ही समितीला मुदतवाढ दिली.परंतु तिच्याकडून तुम्ही गॅझेटरचा अहवाल घेतला नाही, का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही.

आमचं भांडण आणि मागण्या सरकारकडे आहेत

तुम्ही शिंदे समितीकडून 58 लाख नोंदीची घेतल्या त्यावेळेस सरकारने मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे हा आदेश काढायला हवा होता. आतापर्यंत केसेस माघारी घेतल्या नाहीत,बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैसे रोखले, हा मोह मुख्यमंत्र्याला का असावा? आजच तशी शिंदे समिती संभाजीनगरला आली, आम्ही मुंबईच्या निघायच्या टायमाला एवढे दिवस कुठे होती? काय नादी लावायचं आम्हाला फडवणीस साहेब आम्ही नादी लागत नाही,मागण्या तुमच्याकडे आहे खापर शिंदे समिती वरती फोडता का ? फडवणीस साहेब तुम्ही शहाणे असतात तर आमच्या हक्काचा गॅजेट आहे अहवाल आहे सरकार तुमची पाठ थोपवत होती. मी २७ ला आंतरवाली सोडली तर मुंबईत येत असतो, कोण अडवतंय तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. मराठ्यांनो यावेळेस शस्त्र उपसावे लागते लोकशाही मार्गाचे त्याशिवाय पर्याय नाही शस्त्र उपसावंच लागतं जे लोकशाहीचे शस्त्रं आहे ते उपसावं लागतं आणि मुंबईत यावं लागतं असेही जरांगे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.