बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : उल्हास नदीवरील वारंवार उद्भवणारी पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारणे, तसेच गुजरातमधील साबरमती वॉटर फ्रंटसारखा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पत्रव्यवहार करून मागणी केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासोबत बुधवारी (ता. २०) महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्या वेळी उल्हास नदीच्या पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय योजनांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी अंबरनाथ व बदलापूरला पाणीपुरवठा करते. झपाट्याने वाढणाऱ्या बदलापूर शहराचा विकास धीम्या गतीने होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती शहराच्या विकासात मोठा अडथळा ठरत आहे. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देश-विदेशातील यशस्वी उपायांचा अभ्यास करून बदलापूरमध्ये ते राबवावेत, अशी मागणी पातकर यांनी केली होती. त्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावाही करत होते. त्यांनी नुकतीच जलसंपदामंत्री महाजन यांना या संदर्भात पत्रव्यवहार करून तांत्रिक बाबींबाबत चर्चा करण्याची विनंती केली. त्या संदर्भात जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर, कार्यकारी संचालक अतुल कपोले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. जलसंपदा विभागाकडून तांत्रिक अभ्यास आणि उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते संजय भोईर व संतोष जाधव हेदेखील उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख निर्णय
* उल्हास नदीतील गाळ तातडीने काढून पूरस्थिती कमी करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार नदीकाठी बोअर्स टाकण्यात येतील.
* नदीवरील पूरस्थिती नियंत्रणासाठी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारकडे मांडून मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाणार.
* नदी संवर्धनाचे काम हाती घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जलसंपदा अधिकारी व भूगर्भशास्त्रज्ञ यांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार.
* नदीपात्रालगत पुनर्विकासासाठी इच्छुक इमारतींना योग्य त्या नियमांनुसार टीडीआर मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडे शिफारस केली जाईल.
* साबरमती वॉटर फ्रंटच्या धर्तीवर उल्हास नदीवरही सल्लागार नेमून आधुनिक प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
उल्हास नदीच्या पूरस्थितीमुळे बदलापूरकरांचे जनजीवन ठप्प होऊन जाते. यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. गेली अनेक वर्षे या समस्येतून शहराला बाहेर काढण्यासाठी बैठक घेतली. अभ्यासपूर्ण आणि संपूर्ण परिस्थितीचा भौगोलिक आढावा घेऊनच हे मुद्दे मांडण्यात आले. त्यामुळे हे सगळे मुद्दे वास्तविकदृष्ट्या राबवण्यासाठी सरकार दरबारी सतत पाठपुरावा करत राहणार आहे.
- राम पातकर, माजी नगराध्यक्ष
कुळगाव बदलापूर