swt2122.jpg
86062
माणगावः आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य व ठाकरे गटाच्या संघटक मथुरा राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आंजिवडे घाटाचा ‘डीपीआर’ बनतोय
नीलेश राणेः मंजुरीनंतर लगेचच होणार काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः आंजिवडे घाटमार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर घाटाचे काम सुरू होईल, असे आमदार नीलेश राणे यांनी सांगितले. फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदार यांच्यासारखे आम्ही काम करत नाही, तर आमच्याकडे विकासात्मक दूरदृष्टी आहे, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. माणगाव येथील विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व ठाकरे शिवसेनेच्या संघटक मथुरा राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
या मेळाव्याला उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, युवा मोर्चा जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ तालुका महिला प्रमुख वैशाली पावसकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, सचिन धुरी, राजन भगत, दत्ता कोरगावकर, पांडू सावंत आदी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये मथुरा राऊळ यांच्यासह कालेली ग्रामपंचायत सदस्य राजन शेळके, सानिका परब, संयोगिता सावंत, अंजली पेडणेकर तसेच शेकडो ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत आमदार राणे यांनी केले.
आमदार राणे म्हणाले, ‘‘लवकरच आंजिवडे घाट डीपीआर तयार करून तो मंजुरीसाठी जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कोल्हापूर जवळ होणार आहे. शिवापूर ते शिरशिंगे या गावांना जोडणारा रस्ता होणार आहे. अशी अनेक विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहेत. सोनवडे घाट गेली अनेक वर्षे रखडला होता. येथील माजी खासदारांना त्याचा डीपीआर केला पाहिजे, हे सुद्धा त्यांना माहिती नाही. माजी आमदारांनी सुद्धा फक्त टोप्या घालण्याचे काम केले. त्यामुळे या भागाचा विकास रखडला; आता मात्र या विकासाला चालना देण्याचे काम आम्ही करणार आहोत. माणगाव येथे उमेद ट्रेडिंग सेंटर, टेंबे स्वामी, यक्षिणी मंदिर येथे पार्किंग व्यवस्था करण्याचे प्रस्ताव सुरू आहेत.’’ यावेळी युवा सेना पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.