वसई किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला
esakal August 22, 2025 03:45 AM

विरार, ता. २१ (बातमीदार) : तब्बल १० हजार मावळ्यांचे रक्त सांडून पोर्तुगीजांची सत्ता उलथवून मराठ्यांनी वसई किल्ल्यावर भगवा फडकवला होता. या किल्ल्याचा अनेक शतकांंचा साक्षीदार आज (ता. २१) धारातीर्थी पडला. किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळून पडला.

वसईच्या पश्चिमेला खाडीकिनारी चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष असलेला वसईचा किल्ला आहे. वसईत पोर्तुगीजांची सत्ता असताना या किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले होते. सध्या देखभालीअभावी किल्ल्याची दुरवस्था झाली असून, किल्ल्यातील ऐतिहासिक ठेव्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला. यामुळे गेली अनेक शतके किल्ल्याचे सागरी प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्कम दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. काही ठिकाणी डागडुजी आणि इमारतींचे जतन करण्याची कामे सुरू आहेत, मात्र पुरेशा सुरक्षेअभावी गेल्या काही वर्षांत किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक पुरावे, शिल्प आदींची चोरी झाली आहे. या सागरी दरवाजाचीही चोरी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची मागणी किल्लेप्रेमींकडून करण्यात आली आहे.

शतकानुशतकांचा इतिहास, पराक्रम आणि वारसा सांगणारा वसई किल्ल्याचा दरवाजा सरकारच्या उदासीनतेमुळे कोसळला. या किल्ल्याचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार हे केवळ वसईकरांचेच नाही, तर सरकारचेही कर्तव्य आहे. या अवस्थेत किल्ला बघून प्रत्येक वसईकराच्या डोळ्यात वेदना आहेत. किल्ल्याचा तातडीने जीर्णोद्धार व्हावा. वारसा म्हणून त्याला जपावे. वसई किल्ला हा आपला अभिमान आहे. तो ढासळू देऊ नये, अशी मागणी आहे.
- नितीन केशव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता, वसई

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.