शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळागौर स्पर्धा जल्लोषात
मुरूड, ता. २१ (बातमीदार) : मुरूड तालुका शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीतर्फे आयोजित पारंपरिक मंगळागौर आणि भवर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारी बोर्डिंग हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र दळवी व मानसी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या स्पर्धांना महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळागौर स्पर्धेसाठी तब्बल पाच महिला मंडळांनी सहभाग नोंदविला, तर भवर स्पर्धेत दोन गट सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. रंगीत पोशाख आणि पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या स्पर्धेमुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धक महिलांनी केलेल्या जोशपूर्ण तालीम सादरीकरणामुळे स्पर्धा चुरशीच्या झाल्या. मंगळागौर स्पर्धेत संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज महिला मंडळाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या मंडळाला रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक नारीशक्ती महिला मंडळ (नांदगाव) यांना मिळाला असून त्यांना रोख दहा हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांक रायगडच्या हिरकणी मंडळाला देण्यात आले असून त्यांना रोख सात हजार आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. याशिवाय घे भरारी आणि सुहासिनी महिला मंडळ सर्वे यांना प्रत्येकी रोख तीन हजार देऊन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.