Rahimatpur News: गोसावी समाजाला मिळाली दफनभूमी, रहिमतपुरात जागेचे हस्तांतरण; मनोज घोरपडे यांचे प्रयत्न
esakal August 22, 2025 03:45 AM

रहिमतपूर : येथील गोसावी समाजाला हक्काची दफनभूमी मिळाली आहे. यासाठी नगरपालिका हद्दीतील दोन गुंठे जागेचे हस्तांतरण झाले असून, आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

आमदार मनोज घोरपडे सर्वसामान्य लोकांची कामे तातडीने व्हावीत, या उद्देशाने कऱ्हाड उत्तर मतदारसंघात प्रत्येक महिन्यात विविध गावांत जनता दरबार घेत आहेत. त्याचप्रमाणे रहिमतपूर येथे नगरपालिका हद्दीत आमदार घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये मुख्याधिकारी तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने- कदम, संपत माने, वासुदेव माने, रणजित माने, विक्रम माने यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. यामध्ये रहिमतपुरात वास्तव्यास असणाऱ्या गोसावी समाजाला हक्काची दफनभूमी मिळावी, या प्रश्नावर चर्चा झाली.

जनता दरबारात उपस्थित या प्रश्नावर तातडीने अंमलबजावणीच्या सूचना आमदार घोरपडे यांनी दिल्या. त्यानंतर नगरपालिका हद्दीतील दोन गुंठे जागेचे हस्तांतरण दफनभूमीसाठी करण्यात आले. त्याचे दस्तावेजही समाजबांधवांना प्रदान करण्यात आले.

यावेळी शिवाजी शिंदे, विठ्ठल मोरे, आकाश जाधव, रोहित शेटे, अमोल मोरे, राहुल जाधव, गणेश घाडगे आदी उपस्थित होते. यामुळे गोसावी व इतर समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. जनता दरबारामुळे सामान्य लोकांची कामे जलदगतीने होत असून, प्रशासनही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. जनता दरबार कायमस्वरूपी चालू राहावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.