अकोला : शहरातील वाहतूक कोंडी व शिस्तभंगाला कारणीभूत ठरणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांविरोधात शनिवारी (१६ ऑगस्ट) शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी संयुक्त कारवाई केली.
या विशेष मोहिमेत ७७ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आले असून, त्यापैकी ६० ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल ९०,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. उर्वरित १७ ऑटो शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात डिटेन करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही मोहीम बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक, गांधी चौक व इतर प्रमुख ठिकाणी राबविण्यात आली. गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या जीवाशी खेळत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, रस्त्यावर अनियमित पार्किंग करणे, कागदपत्रे व गणवेशाशिवाय वाहन चालविणे आदी उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक मनोज बाहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोउपनि रविंद्र उगवेकर, शेख इकबाल यांच्यासह २४ अमलदारांनी मोहीम पार पाडली. आरटीओ कार्यालयाकडून मोटार वाहन निरीक्षक संदीप तुरकणे, राजकुमार मोमारे तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, गजानन हरणे, नितीन खरात, दिनेश एकडे व श्रीमती मनीषा पांचाळ हे पथकात सहभागी झाले होते. शहरातील नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून, वाहतूक कोंडी कमी होऊन शिस्तबद्धता येण्यासाठी अशा कारवाया नियमित व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समुपदेशन व जनजागृतीकेवळ दंड वसूल करण्यापुरतीच ही मोहीम मर्यादित न ठेवता, चालकांना समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक धोकादायक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत होत आहे.
Akola News: ‘एमसीएच विंग’चे काम निधीअभावी रखडले; कंत्राटदाराचे ८ कोटी थकले, जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांची वाढती गैरसोयअकोला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात शहरातील विस्कळीत वाहतूकीला वळण लागण्यासाठी मोहिम राबवण्यात येत आहे. कुणालाही त्रास व्हावा हा प्रशासनाचा उद्देश नाही. आॅटोचालकांनी रिक्षा चालविताना ऑटो स्टँडचा वापर करावा, रस्त्यावर अनधिकृतपणे ऑटो उभे करू नयेत. वाहनाची सर्व कागदपत्रे व परवाना नेहमी सोबत ठेवावा. गणवेश परिधान करूनच रिक्षा चालवावी. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व शाळकरी मुलांची वाहतूक करू नये. परवान्यात नमूद केलेल्या पेक्षा जास्त प्रवासी घेणे गुन्हा असून, त्यावर कठोर कारवाई होणार आहे. वाहनावरील प्रलंबित दंड त्वरित भरून प्रशासनास सहकार्य करून नागरिकांनाही चांगली सेवा द्यावी हीच अपेक्षा.
- मनोज बहुरे, पोलिस निरिक्षक, शहर वाहतूक विभाग, अकोला