कल्याण बाजार समिती पाण्यात
आवक घटली; भाजीपाला महागणार
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसर जलमय झाला आहे. सततच्या पावसामुळे आवारात गुडघाभर पाणी साचले असून, त्यामुळे शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. ग्राहकांनीही बाजार समितीला पाठ फिरवली असून, बाजारात आलेला माल नासण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजीपाल्याचे भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
कल्याण बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन दिवसांत पावसाचे पाणी साचल्याने शेतमाल विक्रीत अडथळे निर्माण झाले आहेत. मुख्य रस्ते, दुकानांची जागा, व प्रवेशमार्ग सर्वत्र पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ खरेदीदारांनी बाजारात येणे टाळले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळे, फुले, कडधान्य यांचे नुकसान झाले आहे. दररोज सुमारे एक ते एक लाख २५ हजारांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
भाववाढीचा धोका
बाजारातील शेतमालाची मागणी जास्त असूनही पुरवठा अपुरा आहे. घाऊक भाजीविक्रेते गणेश पोखरकर यांच्या मते, दोन दिवसांत आवक कमी झाली असून, मागणी वाढल्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या भावात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
फुलांचे भाव दुपटीने वाढले
घाऊक फुलविक्रेते प्रसाद कुंडे यांनी सांगितले की, श्रावण महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात फुलांच्या विक्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस असूनही खरेदीदारांनी बाजार समितीपासून दूर राहणे पसंत केले आहे. परिणामी, फुलांचा मोठा साठा नासला आणि फुलांचे भाव दुपटीने वाढले आहेत.
ग्राहकांच्या अपेक्षा
सोनाली दीपक बागुल या स्थानिक गृहिणी म्हणाल्या, “बाजार समितीत योग्य सुविधा असल्या, तर आम्ही येथे येऊन स्वस्त भावात भाजीपाला, फळे, फुले घेऊ शकतो, पण सध्या अस्वच्छता, पाणी आणि पायाभूत सुविधा नसल्याने तिकडे जाणे शक्य होत नाही.”
आर्थिक फटका
गणेशोत्सव जवळ आला असतानाच कल्याण बाजार समिती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी, विक्रेते आणि ग्राहक सगळ्यांनाच आर्थिक फटका बसत आहे. भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना खर्चाचा सामना करावा लागणार असून, बाजार समिती प्रशासनासमोर पायाभूत सुविधांच्या उभारणीचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काँक्रीट रस्त्यांचे काम लवकरच सुरू
बाजार समितीचे सचिव संजय ऐडगे यांनी सांगितले की, “पावसामुळे रस्ते व परिसर जलमय झाल्याने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने निचऱ्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच बाजार समितीत काँक्रीट रस्त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक लवकरच घेतली जाईल.” नवीन सभापती रवींद्र घोडविंदे यांनीही आश्वासन दिले की,“सध्याची अडचण लक्षात घेऊन बाजार समितीमध्ये एक ‘ॲक्शन प्लान’ तयार केला जाईल आणि सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील.”
शेतमालाची आकडेवारी (गाडी व क्विंटलनुसार)
दिनांक लहान गाड्या मोठ्या गाड्या एकूण गाड्या एकूण मालाची आवक (क्विंटल)
१९ ऑगस्ट २२२ ५८ २८० ६,०३१.७
२० ऑगस्ट १४८ ४९ १९७ ६,५४५.७
२१ ऑगस्ट १२२ ५२ १८० ७,३५९.६