जव्हारमध्ये रानभाजी महोत्सव साजरा
८० दुर्मिळ रानभाज्या व ६० पाककृतींचा समावेश
जव्हार, ता. २१ (बातमीदार) ः तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक येथे मंगळवारी (ता. २१) सकाळी १० वाजता बायफच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक ज्ञान, महिलांचा सहभाग आणि सामुदायिक एकोपा यांचा संगम असलेल्या या महोत्सवात ८० हून अधिक दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले. या वेळी स्थानिक महिलांनी सुमारे ६० आगळ्या-वेगळ्या पाककृती तयार करून या भागातील समृद्ध पोषणमूल्ये व सांस्कृतिक वारसा उलगडला.
या महोत्सवात अंगणवाडी सेविका, स्थानिक महिला व बायफच्या टीमसह एकूण ८४ महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमातील मान्यवरांनी महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक करून रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पौष्टिक अन्नपद्धतींचा प्रसार व शाश्वत उपजीविकेसाठी या उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. रानभाजी महोत्सवाने पारंपरिक शहाणपणाला नवसंजीवनी देत सामुदायिक बंध अधिक मजबूत केले आणि महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली. या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, बायफचे राजेश कोटकर, ग्रामपंचायत सदस्य सविता मोकाशी, उमेदचे दयानंद सपकाळ आणि न्याहाळे शाळेचे प्राचार्य गोविंद व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
रानभाजीचे महत्त्व टिकवण्यासाठी तांडेलपाडा गावाचा पुढाकर
विक्रमगड (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील आंबेघर तांडेलपाडा गाव गेल्या तीन वर्षांपासून रानभाजी महोत्सव साजरा करीत आहेत. यामध्ये तांडेलपाड्यातील गावकरी रानात (जंगलात) जाऊन रानातील विविध भाज्या घरी आणतात. यामध्ये २५ ते ३० भाज्या घेऊन आणि बनवून खाण्याचा योग गावकऱ्यांना मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुदेश राजेशिर्के व त्यांचा सहपरिवार उपस्थित राहून रानभाज्यांची माहिती व महत्त्व समजून घेतले. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन नीलेश कोदे यांनी केले. वयम् चळवळीचे विक्रमगड तालुका अध्यक्ष देवेंद्र थोटगा यांनी रानभाजीचे संवर्धन कसे करता येईल, हे सांगितले.
पावसाळ्यात निसर्गतः अनेक जिन्नस उपलब्ध होत असतात. जंगलव्याप्त या परिसरातील रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना तयार होत असलेल्या या रानभाज्या शारीरिक क्षमता वाढविणे, कुपोषणमुक्ती करणे आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी लाभदायक ठरतात.
- दीपक टिके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार