घणसोली एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
कोपरखैरणे, ता. २१ बातमीदार ः घणसोली एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा अभाव आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा वाढता विलंब, यामुळे स्थानिक नागरिक आणि औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना साहित्य पुरवठा, कामगारांची ये-जा या सगळ्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. नागरिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी ठोस सुधारणा दिसून येत नाही. दरम्यान, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे काम दीर्घकाळ लांबल्याने घणसोलीतील प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. वाशी- तुर्भे- घणसोली- ऐरोली मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास सार्वजनिक वाहतुकीवर मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र नियोजित वेळापत्रक वारंवार पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती व मेट्रो प्रकल्पाचा गतिमान आढावा तातडीने न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.