इंदापूर विभागात बिबट्याची दहशत
मानवी वस्तीत मुक्त संचार; बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी
माणगाव, ता. २१ (बातमीदार) : माणगाव तालुक्यातील कशेणे व परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत या बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. लहान मुले, महिला व वयोवृद्धांना घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेनेने आक्रमक पवित्रा घेत वन विभागाला तत्काळ उपाययोजना करण्याचे निवेदन दिले आहे.
जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वन क्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात कशेणे व विघवली वारक भागात बिबट्याचा वावर वारंवार दिसत असून, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, असे स्पष्ट करण्यात आले. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींनंतरही अद्याप वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे गावात तातडीने ‘बचाव पथक’ तैनात करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उच्चस्तरीय परवानग्या घेऊन कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे, तर वन विभागाने तत्काळ कारवाई न केल्यास युवासेनेकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख सौरभ खैरे, नीलेश पाखड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.