खालिद का शिवाजी'च्या दिग्दर्शकाची उच्च न्यायालयात धाव
esakal August 22, 2025 03:45 PM

‘खालिद का शिवाजी’च्या दिग्दर्शकाची उच्च न्यायालयात धाव
मुंबई, ता. २१ ः वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा वाद गुरुवारी (ता.२१) उच्च न्यायालयात पाहोचला. चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मोरे यांच्या याचिकेवर न्या. रेवती मोहिते- डेरे आणि न्या. डॉ . नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी प्राथमिक सुनावणी झाली.त्यावेळी याचिकेत सुधारणा करण्याची मागणी मोरे यांच्याकडून करण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मोरे यांना वेळ दिला आणि याचिकेची सुनावणी तहकूब केली.
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून शीर्षकावरूनच वादाला सुरुवात झाली. शिवाजी खालिदचा कसा असू शकतो, हा या आक्षेपांमधला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये ऐकू येणाऱ्या संवादांमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान सैनिक होते, त्यांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते, असे दाखले देण्यात आले आहेत. तसेच, रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती, असाही उल्लेख ट्रेलरमध्ये असल्यामुळे हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेत चुकीचा इतिहास पसरवल्याबदल चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली. या मागणीनंतर चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले आहे.

चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित
या चित्रपटासंदर्भात निर्णय देताना इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मांडली. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खुद्द राज्य सरकारनेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करून प्रदर्शनच थांबवण्याची विनंती केली. तत्काळ या निर्णयावर अंमलबजावणी होऊन चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले.
--------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.