गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत, या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट इम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
मात्र युती म्हणून लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठ्या पराभावाचा सामना करावा लागला. ठाकरे बंधूंना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. एकूण 21 जांगासाठी ही निवडणूक होती. त्यापैकी 14 जागा या शशांक राव यांच्या पॅनेललने जिंकल्या तर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या पॅनलने सात जागांवर विजय मिळवला. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.
दरम्यान आता या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्यासह इतर 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
‘उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की, शिवसेना – उध्व बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित बेस्ट कामगार सेनेचा मागील ३० वर्ष प्रथम ‘सरचिटणीस’ व नंतर ‘अध्यक्ष’ म्हणून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली.
नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढीच्या सन २०२५-२०३० पर्यंत पंचवार्षिक निवडणुकीत बेस्ट कामगार सेना प्रणित उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारून मी माझ्या कार्यकारिणीसह (कोअर कमिटी) बेस्ट कामगार सेना या संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. कृपया त्याचा स्विकार करावा. ‘ असं या पत्रात म्हटलं आहे.
मोठा पराभव
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं प्रथमच युतीमध्ये ही निवडणूक लढवली होती, मात्र 21 पैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागा जिंकल्या.