रावेत, ता. २२ : सततच्या पावसामुळे विकासनगर, साई कॉलनी, बापदेव नगर आणि पेंडसे कॉलनी या किवळे भागातील अनेक सांडपाणी वाहिन्या तुंबल्या होत्या. त्यामुळे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक खोळंबा होत होता. अखेर प्रशासनाने या वाहिन्यांची साफसफाई सुरू केली आहे. सकाळपासून पथके तैनात करून जेट मशीनच्या मदतीने चोकअप झालेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे.
‘‘गल्लीबोळात साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. माशा, डास यांचा प्रादुर्भाव वाढल्याने आजारांचा धोका निर्माण झाला होता. घरासमोर कायम पाणी साचलेले असल्याने मुलांना बाहेर खेळायलाही घाबरावे लागते,’’ असे गृहिणी ममता पवार यांनी सांगितले. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न डोकेदुखी ठरत असल्याने, सांडपाणी लाईनचे नियोजनबद्ध देखभाल आणि वेळेवर साफसफाई करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पाण्यातून जाणे म्हणजे लहान मुलांना मोठा धोका. पालिकेने नियमित लक्ष ठेवावे. सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने दुकानदारांना नुकसान होत होते. आता तरी परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. पालिका प्रशासनाने कामाला गती दिली असली तरी ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी
- ऐश्वर्या तरस, स्थानिक नागरिक
साई कॉलनीत पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या उद्भवते. वेळेवर साफसफाई झाली तर हा त्रास कमी होईल.
अमोल कालेकर, रहिवासी
या समस्येची गंभीर दखल घेत महानगरपालिकेने तातडीने काम सुरू केले आहे. हा नियमित कामाचा भाग असून विकासनगर आणि बापदेव नगर येथील मुख्य लाईनची साफसफाई पूर्ण झाली आहे. या वाहिन्या लवकरच कार्यान्वित होतील.
- दीपक करपे, उप अभियंता, ब क्षेत्रीय कार्यालय