पिंपरी, ता. २२ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय उपचार केंद्रांमध्ये अग्नितपासणी (फायर ऑडिट) आणि अग्निसुरक्षा नियमपालन प्रमाणपत्र (फायर सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट) प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील चाणक्य सभागृहात हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
चालू आर्थिक वर्षासाठी अग्निशमन परवानगीपत्र काढण्यासंदर्भात यावेळी सविस्तर माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन परवानगीपत्रासाठी कसा अर्ज करायचा, यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर कोणती आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची, याबाबत सहाय्यक आयुक्त ढाकणे व उपअग्निशमन अधिकारी चिपाडे यांनी मार्गदर्शन केले. ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय विभागाचा परस्पर समन्वय कसा असावा, याबाबतही माहिती देण्यात आली. प्रशिक्षण सत्रात महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व अग्निशमन केंद्रप्रमुख तसेच महापालिकेच्या विविध दवाखान्यांमधील व उपचार केंद्रांमधील डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
‘‘महापालिकेच्या आरोग्यसेवा केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या उपक्रमामुळे डॉक्टर आणि आमच्या विभागामध्ये समन्वय वाढेल आणि सर्व आरोग्य केंद्रे कायदेशीर निकषांचे पालन करून अधिक सुरक्षित होतील.’
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
‘‘रुग्णसेवा करणाऱ्या प्रत्येक केंद्रासाठी सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे. अग्निसुरक्षा नियमपालनाची योग्य अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री मिळते. अग्निशमन विभागाच्या सहकार्याने घेतलेले हे प्रशिक्षण त्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.’
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
---