आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. यासाठी आयसीसीने आतापासूनच कंबर कसली आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशात होणार आहे. या तिन्ही देशांकडे यजमानपद असून दक्षिण अफ्रिका क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेसाठी स्टेडियमची घोषणा देखील केली आहे. या स्पर्धेतील एकूण 54 सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण अफ्रिकेत 44 सामने, तर 10 सामने झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे खेळले जाणार आहेत. दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे दुसऱ्यांदा यजमानपद भूषवतात. तर नामिबियाकडे पहिल्यांदाच यजमानपद आलं आहे. या स्पर्धेसाठी दक्षिण अफ्रिकेतील आठ मैदानं निवडली आहे. दक्षिण अफ्रिका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पर्ल माफोशे म्हणाले, ‘सीएसएचे लक्ष्य एक जागतिक, प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करणे आहे. या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेचा खरं रूप समोर येईल. वैविध्यपूर्ण, समावेशक आणि एकजूट या माध्यमातून प्रतिबिंबित करेल.’
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा फॉर्मेट 2023 वनडे वर्ल्डकप सारखाच असणार आहे. यात दोन गट असतील आणि प्रत्येक गटात सात संघ असतील. जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियम, केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, डर्बनमधील किंग्जमीड क्रिकेट ग्राउंड, प्रिटोरियामधील सेंच्युरियन पार्क, ब्लोमफॉन्टेनमधील मंगाउंग ओव्हल, ग्केबेर्हामधील सेंट जॉर्ज पार्क, पूर्व लंडनमधील बफेलो पार्क आणि पार्लमधील बोलँड पार्क यांचा समावेश आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा साधारणत: सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे.
भारताला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे रोहित शर्मालाही अश्रू अनावर झाले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघ तयारीला लागला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दक्षिण अफ्रिकन मैदानाचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून कसून सरावाला लागलं पाहीजे. आता दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतात.