>> चैताली कानितकर
साहसाचा रोमांचकारी अनुभव देणारा अन् सोबत धार्मिक व आध्यात्मिक जोड असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला असा ट्रेक म्हणजे ब्रुगू लेक ट्रेक. ऋतूनुसार रंगबदल अशी खासियत असणारा हा ट्रेक एकदा तरी करायला हवा.
हिमाचल प्रदेशातील अनेकविध ट्रेक्सपैकी निसर्गसौंदर्याने नटलेला, साहसी पर्यटकांना अद्वितीय अनुभव देणारा ट्रेक आहे ब्रुगू लेक ट्रेक! ब्रह्मदेवाचे मानसपुत्र समजले जाणारे भृगू ऋषी हे सप्तर्षींपैकी एक. त्यांना हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे ऋषी मानले जाते. ते ज्योतिषशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जातात. भृगू लेक ट्रेक आणि भृगू ऋषी यांचा संबंध असा की, हा तलाव हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिह्यात आहे आणि स्थानिक परंपरेनुसार भृगू ऋषींनी या तलावाच्या परिसरात दीर्घकाळ ध्यान केल्यामुळे हा तलाव पवित्र झाला. या तलावाला ऋषी भृगू यांच्या नावावरून भृगू लेक असे नाव मिळाले आहे, असे मानले जाते. भृगू नावाचा अपभ्रंश होऊन या ट्रेकला ब्रुगू लेक असे म्हटले जाते. हा ट्रेक फक्त रोमांचकारी अनुभव नसून धार्मिक व आध्यात्मिक जोडही याला लाभलेली आहे.
मॉडरेट या स्वरूपातील या ट्रेकची उंची 14100 फूट असून एकूण चालायचे अंतर आहे 27-28 किलोमीटर इतके. साधारण कोणत्याही ट्रेक कंपनीसोबत गेलो तरी हा ट्रेक 3-4 दिवसांतच पूर्ण करता येतो. मार्च ते जून, ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत हा ट्रेक केल्यास उत्तम. मनालीपासून 20 किलोमीटर गुलाबा हे ठिकाण या ट्रेकचा बेस कॅम्प आहे. मनालीहून येथे गाडीने आणले जाते. रात्री याच कॅम्पसाईटवर मुक्काम करून दुसऱया दिवशी ट्रेकला खरी सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. गुलाबा ते रोला खोली साधारण 6-7 किमी अंतर आहे. हे अंतर कापत असताना झाडांनी वेढलेली जंगले, मोकळी कुरणे लागतात. पर्वत शिखरांचे विहंगम दृश्य दृष्टीस पडते. मे-जूनमध्ये स्लो लाइनवरून चालताना फारच सुखद अनुभव घेता येतो. भृगू लेक हिवाळ्यात पूर्ण गोठलेला असतो. वसंतात निळसर, उन्हाळ्यात हिरवट रंगाचा दिसतो.
ऋतूनुसार रंगबदल या ट्रेकची खासियत आहे असे म्हणायला हरकत नाही. रोला खोली ते भृगू व परत समीट करून रोला खोपडी हे अंतर 10-12 किमी आहे. हे अंतर पार करताना ट्रेकर्सचा विशेष कस लागतो. समीटवर पोहोचल्यावर तलावावर शांत वातावरणाचा अनुभव आल्यावाचून राहत नाही. हिवाळ्यात तर तलाव गोठलेलाच असतो, परंतु मे-जून महिन्यांतसुद्धा तलावातील पाणी बर्फासारखे थंड असते. त्यामुळे थंडीपासून बचाव करणारी वस्त्रs काढण्याची चूक करून चालत नाही.
मे-जून महिन्यात दुपारी 2 नंतर येथील हवामान प्रचंड वेगानं बदलतं. अचानक गडगडाट, विजा, बर्फ, पाऊस पडायला सुरुवात होते. अनेक ट्रेकर्सना या परिस्थितीत पुढील अंतर कापणे अवघड होऊन बसते. त्यामुळे ट्रेक लिडरच्या सर्व सूचनांचे पालन करणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ट्रेकर्सचे कर्तव्यच आहे.
हिमाच्छादित शिखरे, पवित्र तलाव, हिमालयीन शांतता हे तर या सफारीत अनुभवता येतेच, पण पायथ्यापासून तलावापर्यंतचा प्रवास म्हणजे एका साहसाची शिडी चढण्याचे धाडस आहे. हा ट्रेक जरी लहान असला तरी ट्रेकदरम्यान तंबूत राहण्याचा, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत शेकोटीजवळ बसून चंद्रप्रकाशात उत्तुंग हिमालय पाहण्याचा हा अनुभव स्वत घ्यावाच लागेल. आपल्या शरीराची आणि मनाची फिटनेस लेव्हल जज करायला ट्रेक सर्वोत्तम उपाय आहे. शेवटचे दोन दिवस पुन्हा आपण रूला खोपडी ते गुलाबा व गुलाबा ते मनाली असा प्रवास करतो. दिल्ली, चंदिगड येथूनही बेस कॅम्पला सहज पोहोचता येते. ट्रेक करताना होणारी दमछाक, दमणूक हे सार अद्भुत निसर्गसौंदर्य विसरायला लावतं, मन प्रसन्न करून जातं. परतीच्या प्रवासात वाटतं धुक्यातून दिसणारा एक जादुई तलाव आणि हिमालयाच्या कुशीत लपलेला हा रोमांचक थरार मी पूर्ण केला.