Kondhwa News : अल्पवयीन टोळक्याचा भयंकर कृत्य, वादाचा राग पार्क केल्या गाड्यांवर काढला, पुण्यातील धक्कादायक घटना
Saam TV August 24, 2025 11:45 AM
  • पुण्यातील कोंढवा मिठानगर भागात मध्यरात्री अल्पवयीन टोळक्याने वाहनांवर हल्ला केला.

  • तीन रिक्षा आणि दोन कारच्या काचा फोडून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

  • पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं.

  • नागरिकांनी पोलिस गस्त वाढवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात वाहनतोडफोडीचं सत्र कायम असतानाच कोंढवा येथून धक्कदायक बातमी समोर आली आहे. किरकोळ कारणावरून भांडण झाल्यानंतर चार जणांच्या टोळक्याने आपला राग शेजारच्या वाहनांवर काढला. मध्यरात्रीच्या सुमारास मिठानगर भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तीन रिक्षा आणि दोन कारच्या काचा फोडून टोळक्याने चांगलीच दहशत माजवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांपैकी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. मिठानगर येथील रिक्षाचालक अतिक अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते घराबाहेर रिक्षा उभी करून झोपले होते. अचानक मध्यरात्री ३ ते ४ तरुण दुचाकीवरून गल्लीत आले. त्यांच्या तोंडाला मास्क लावलेले होते आणि हातात धारदार हत्यारे होती. या तरुणांनी गल्लीमध्ये आरडाओरडा करत अचानक हल्ला सुरू केला. शेख यांच्या रिक्षेवर हत्याराने वार करून काचा फोडण्यात आल्या. आवाजामुळे शेख खाली आले असता त्यांच्या रिक्षेची काच पूर्ण फोडलेली दिसली, तसेच फ्रेमसुद्धा वाकलेली होती.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

त्याचवेळी मिर्झा समी हे आपली मारुती कार घेऊन जात असताना आरोपींनी त्यांच्याही गाडीवर हल्ला केला. कारच्या दोन्ही बाजूंच्या दरवाज्याच्या काचा, तसेच पुढील आणि मागील बाजूच्या काचाही फोडल्या. सुदैवाने समी गाडीत खाली वाकलेले असल्याने त्यांना गंभीर इजा झाली नाही. या टोळक्याने परिसरातील आणखी दोन रिक्षा आणि एका कारच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

घटनास्थळी नागरिक जमा झाले असता आरोपींनी तेथून पळ काढला. कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी रात्री कारवाई करून चौघांपैकी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौथ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, “आरोपी अल्पवयीन असून त्यांच्या आपापसातील किरकोळ वादाचा राग त्यांनी शेजारच्या वाहनांवर काढला आहे. तीन आरोपी आमच्या ताब्यात असून चौथ्याचा शोध सुरू आहे.”

Pune News: पुण्यातील सैराट प्रकरणात मोठा ट्विस्ट! प्रेम की फसवणूक? वाचा संपूर्ण प्रकरण

या घटनेनंतर मिठानगर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली. अल्पवयीन मुलांकडून वारंवार अशा घटना घडत असल्याने परिसरातील शिस्त व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी पोलिस गस्त वाढवावी, तसेच अशा प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अल्पवयीन आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अचानक मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याने मिठानगरवासीयांना मात्र अजूनही धक्का बसलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.