अभिनेता विजय थलापती यांच्या पक्षाचं तमिळग विदुथलाई काची (टीव्हीके)चं दुसरं राज्यस्थरीय संमेलन मदुराईमध्ये पार पडलं,या संमेलनामध्ये बोलताना राज्यात 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तसेच त्यांनी आपल्या समर्थकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत. भाजप आणि आमच्या विचारांमध्ये टोकाचे मतभेद आहेत, आणि द्रमुक डीएमके आमचे राजकीय शत्रू आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा पक्ष या दोन पक्षांशी युती करणार नाही, असं थलापती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विजय थलापती यांचा पक्ष तामिळनाडूमध्ये बीजेपीसोबत युती करू शकतो, अशी अपेक्षा भाजपला होती. परंतु आता थलापती यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुढे बोलताना विजय यांनी म्हटलं की, टीव्हीके कोणाला घाबरणारी पार्टी नाहीये, आम्ही काही चुकीचे काम करत नाहीत, संपूर्ण तामिळनाडू आमची ताकद आहे. चला आपण सर्वजण भाजप आणि द्वेषाचं राजकारण करणाऱ्या द्रमुक विरोधात उभे राहू असं आवाहन यावेळी विजय थलापती यांनी केलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, भाजप तामिळनाडूमधील जनतेच्या गरजेकडे दुर्लक्ष करत आहे. तुम्ही आमच्यासाठी जी गरजेची कामं आहेत ती करत नाहीत. तुम्हाला वाटत असेल की 2029 चा तुमचा प्रवास सोपा असेल ती निवडणूक तुमच्यासाठी सोपी असेल तर तो गैरसमज आहे, लक्षात ठेवा दवबिंदू कमळाच्या पाकळ्यांवर जास्त काळ टिकत नाही, तामिळनाडूमधील जनता कधीच तुमची साथ देणार नाही, असं थलापती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा उल्लेख स्टॅलिन अंकल असा केला आहे. तुम्ही महिलांना दर महिन्याला हजार रुपये देतात, हे तुमच्यासाठी पुरेस आहे का? त्यांचा आक्रेश तुम्हाला ऐकू येत नाहीये का? असा सवाल यावेळी विजय थलापती यांनी केला आहे.