आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोनपासून ते गाड्यांपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणात सेमीकंडक्टर चिपचा वापर होतो. ही छोटीशी चिप आधुनिक जगाचा पाया बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 2025 पर्यंत भारताची पहिली स्वदेशी चिप बाजारात आणण्याची मोठी घोषणा केली. ही चिप म्हणजे काय आणि भारतासाठी ती का महत्त्वाची आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.
सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय?सेमीकंडक्टर चिपला ‘मायक्रोचिप’ किंवा ‘इंटिग्रेटेड सर्किट’ असेही म्हणतात. ही एक लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, जी सिलिकॉनपासून बनलेली असते. ही वीज अंशतः वाहून नेते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही चिप लहान असूनही यात लाखो-करोडो ट्रान्झिस्टर असतात, जे इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रित करतात. आपले स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टीव्ही, गाड्या, वैद्यकीय उपकरणे, आणि अगदी क्षेपणास्त्रांसारख्या संरक्षण उपकरणांमध्येही या चिप्स ‘मेंदूप्रमाणे’ काम करतात.
वापर आणि महत्त्वसेमीकंडक्टर चिप्सचा वापर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये होतो. उपग्रहांचे (satellite) डेटा गोळा करण्यापासून ते सिग्नल पाठवण्यापर्यंत सर्व कामे या चिप्स करतात. आकार लहान पण काम खूप मोठे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि स्मार्ट डिव्हाईसेसमध्येही यांचा वापर होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जसा आपला मेंदू काम करतो, त्याचप्रमाणे ही चिप्स स्मार्ट डिव्हाईसेसचा मेंदू आहेत.
उत्पादन करणारे प्रमुख देशसध्या जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन काही मोजक्या देशांमध्ये होते, जसे की तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका. आज भारत या चिप्ससाठी आयातीवर अवलंबून आहे. अमेरिका चिप्सची रचना (design) करते, तर तैवान आणि दक्षिण कोरिया मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन करतात. तैवान हा जगातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर चिप्सचा उत्पादक आहे.
भारताची योजनाभारत सरकारने या दिशेने अनेक मोठी पावले उचलली आहेत. 2021 मध्ये, केंद्र सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले, ज्यासाठी 76,000 कोटी रुपयांची योजना आखली गेली. याचे उद्दिष्ट भारतात चिप निर्मितीसाठी अत्याधुनिक ‘फॅब्रिकेशन प्लांट्स’ (Fab) आणि डिझाइन इकोसिस्टम विकसित करणे आहे. नुकतेच, गुजरातच्या धोलेरा येथे एक मोठा सेमीकंडक्टर फॅब स्थापित करण्याची घोषणा झाली आहे, ज्यात टाटा समूह आणि तैवानमधील कंपन्यांशी भागीदारी केली जात आहे.
भारतातील उत्पादनाचे फायदेपंतप्रधान मोदी यांचे हे स्वप्न फक्त तांत्रिक आत्मनिर्भरतेपुरते मर्यादित नाही. यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक स्थिती मजबूत होईल. या उद्योगातून लाखो नोकऱ्या निर्माण होतील, विशेषतः अभियांत्रिकी (engineering) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात. तसेच, स्वदेशी चिप्समुळे लष्करी उपकरणांची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढेल, ज्यामुळे भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत होईल.
याशिवाय, स्थानिक उत्पादन वाढल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि भारताचे परकीय चलन वाचेल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात भारत एक जागतिक पॉवरहाऊस बनू शकतो, ज्यामुळे देशाच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर नियंत्रण राहील.