बारामती, ता. २४ : शहरातील खंडोबानगर येथील चौकात झालेल्या अपघातानंतर बारामतीतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. नागरिकांनी प्रशासनावर टीकेचा भडिमार केला. यातून काही सुधारणा झाल्याही मात्र, बेशिस्त वाहनचालकांचे डोळे लाखोंचा दंड करूनही उघडतच नाही, असेच चित्र आजही दिसत आहे.
खंडोबानगरच्या अपघातात वडील व दोन लहान मुलींना जीव गमवावा लागल्यानंतर बारामतीत नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर बारामतीच्या वाहतुकीवर मोठी चर्चा झाली. अनेकांनी सूचना केल्या, प्रशासनानेही त्याची दखल घेत काही बदल करण्याचा प्रयत्न केला. यात काही अधिकारी टीकेचे धनी झाले, प्रशासनाने त्यांच्या परीने उपाययोजना करण्याचा आटोकाट प्रयत्न केलाही, मात्र ठराविक बेशिस्त बारामतीकर वाहनचालकांनी काहीही केले तरी आम्ही नियम पाळणारच नाही असा जणू निश्चय केला आहे की काय? अशी स्थिती आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. वाहनतळासाठी जागा नाही. एक वाहन लागले तरी वाहतुकीची कोंडी होते, अशा रस्त्यांवरही अनेक बेफिकीर वाहनचालक बिनधास्त गाडी लावून निघून जातात. वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही त्याला न जुमानता आम्ही नियम मान्यच करणार नाही, अशा आविर्भावात वाहने लावली जातात. अनेकदा वाहन रस्त्यातून काढा असे सांगणाऱ्या नागरिकांना अशा वाहनचालकांकडून लाखोली वाहिली जाते. अशा वाहनांचे फोटो व्हायरल झाल्यावर पोलिस दंडात्मक कारवाई करतातही, पण वाहनचालक काही या दंडाला जुमानेसे झाले असल्याचे चित्र दिसते.
वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नियम डावलणाऱ्या या वाहनचालकांवर आता दंडात्मक कारवाईच्या पुढील कारवाई करून हे खटले न्यायालयात पाठवायला हवेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिस कारवाईचे काम करत आहेत, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर कारवाईची कटू वेळ येणार नाही, वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरिक्षक, वाहतूक शाखा, बारामती.
प्रशासन त्यांचे काम करतच आहे. पण वाहतुकीचे नियम प्रत्येक नागरिकाने पाळले तर आपोआपच परिस्थिती सुधारेल. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, कट मारून पुढे जाणे, अचानक वळणे या बाबी टाळायला हव्यात.
- डॉ. अजिंक्य राजेनिंबाळकर, बारामती.