गेल्या सहा महिन्यांत शेअरबाजारातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांना थेट शेअर्स आणि म्युच्युअल फंड दोन्हीत मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.
सप्टेंबर 2024 च्या शेवटी सेन्सेक्स साधारण 85,000 च्यावर पोहोचला होता. पण त्यानंतर पुन्हा चढउतार दिसून आली. नंतर अवघ्या सहा महिन्यांत सेन्सेक्समध्ये जवळपास 13 टक्क्यांची घट झाली होती.
त्याहूनही जास्त फटका छोट्या आणि मध्यम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बसला असून, त्यांना 25 ते 30 टक्केपर्यंत तोटा सहन करावा लागला.
या काळात म्युच्युअल फंडात एसआयपी करून गुंतवणूक करणाऱ्यांनाही 20 टक्के किंवा त्याहून जास्त नकारात्मक परतावा मिळाला आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण घटले आहे. विशेषतः ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर आणि टॅरिफ युद्धाची घोषणा केल्यावर बाजाराला मोठा फटका बसला.
या काळात अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर राहून इक्विटीशिवाय गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहेत.
बीबीसी गुजरातीने आर्थिक तज्ज्ञांशी संवाद साधून अशा पाच गुंतवणुकीचे पर्याय मांडले आहेत ज्यात गुंतवणूकदार पैसे गुंतवू शकतात. या सर्व पर्यायांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक कशी करावी?तज्ज्ञांच्या मते, एक ते तीन वर्षांसाठी स्थिर परतावा हवा असेल तर कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करता येते.
यात महागाईपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा (मुदत ठेव) जास्त व्याज मिळतं. परंतु, त्यासाठी बाँडचं रेटिंग पाहणं खूप गरजेचं आहे.
सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर मिथुन जथल म्हणतात, 'कॉर्पोरेट बाँड हे फिक्स्ड इन्कम (निश्चित उत्पन्न) आणि कर्जाच्या श्रेणीत येतात. भारतात चार प्रकारचे बाँड्स आहेत- केंद्र सरकारचे बाँड्स, राज्य सरकारचे बाँड्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) बाँड्स आणि कॉर्पोरेट बाँड्स.'
"बाँड्ससोबत दोन प्रकारच्या जोखीम जोडलेल्या असतात- डिफॉल्ट जोखीम आणि व्याज दराची जोखीम."
"भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेचे बाँड्स सर्वात सुरक्षित असतात आणि त्यात कर्ज न फेडण्याचा किंवा डिफॉल्ट होण्याचा धोका जवळजवळ शून्य असतो. परंतु, कंपन्यांचे बाँड्स घेताना काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. कारण जास्त व्याज मिळवण्याच्या लोभापोटी काही लोक कमी दर्जाचे म्हणजेच खराब रेटिंग असलेले बाँड्स विकत घेतात, आणि जर अशी कंपन्या पैसे परत करू शकल्या नाहीत तर गुंतवलेली रक्कम आपण पूर्णपणे गमावू शकतो," असं जथल म्हणतात.
मिथुन जथल म्हणाले की, "जर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर ज्या कंपन्यांकडे भरपूर रोकड आहे आणि ज्यांचं रेटिंग 'AAA' आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा."
जर तुम्हाला एक वर्षापेक्षा कमी वेळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर A1+ हे सर्वोच्च रेटिंग आहे. मिथुन जठाल म्हणाले की, "नेहमी अशा कंपन्यांचे बाँड्स खरेदी करावेत ज्यांचे रेटिंग AA किंवा त्याहून जास्त आहे. कमी रेटिंग असलेली कंपनी जोखमीची ठरू शकते."
यापूर्वी, 2018 मध्ये आयएल अँड एफएस ही कंपनी बाँड्स परतफेडीत अपयशी (डिफॉल्ट) ठरली. त्यामुळे आर्थिक बाजारात तणाव निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे, 2019 मध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्सचे बाँड्स देखील डिफॉल्ट झाले होते.
मिथुन जथल म्हणतात की, "जर थेट बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याचं रेटिंग पाहणं महत्त्वाचं आहे. सरकारी बाँडमध्ये थेट गुंतवणूक करणं छोट्या गुंतवणूकदारांसाठी कठीण असतं, कारण काही बाँड्समध्ये किमान 10 लाखांपासून गुंतवणूक सुरू होते. त्यामुळे छोटे गुंतवणूकदार डेट म्युच्युअल फंडांमार्फत कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवणूक करू शकतात."
ते म्हणतात की, "जर एखादी कंपनी आपल्या बाँड्सवर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत असेल, तर त्यातील जोखमीची नीट तपासणी करणं गरजेचं आहे."
अहमदाबाद येथील इन्व्हेस्टर पॉइंटचे संस्थापक आणि आर्थिक सल्लागार जयदेवसिंह चुडासमा म्हणाले की, "जर शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसेल, तर नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. याशिवाय, डेट आणि डेरिव्हेटिव्ह्सचे मिश्रित फंडही आहेत, ज्यात करसवलती इक्विटीसारख्याच असतात. अशा फंडमध्ये सुप्रसिद्ध कंपन्या साधारण 9 टक्के ते 9.60 टक्के दरम्यान व्याज देऊ शकतात."
बँक किंवा कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कशी करायची?बँक एफडी हा गुंतवणुकीसाठी सर्वांचा कायमचा लोकप्रिय पर्याय आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक त्यावर विश्वास ठेवतात. पण त्यातही व्याजदर, बँक दिवाळखोरीचे धोके आणि मुदत संपण्यापूर्वी पैसे काढल्यास लागणारा दंड याचा विचार करणं आवश्यक आहे.
बँक दिवाळखोरीत निघाली तरीही 5 लाख रुपयांपर्यंतची एफडी विमा संरक्षणाखाली येते, त्यामुळे ही रक्कम सुरक्षित मानली जाते.
मिथुन जथल म्हणतात की, "सरकारी बँका किंवा मोठ्या खासगी बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. परंतु, जास्त व्याजाच्या आमिषाने सहकारी बँकांमध्ये एफडी करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यात पैसे गमावण्याचा धोका असतो."
5 लाखांपर्यंतची एफडी सुरक्षित असते. पण बँक दिवाळखोरीत गेली तर पैसे मिळायला वेळ लागू शकतो.
ते म्हणतात की, "कोव्हिडच्या काळात पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक दिवाळखोरीत गेली होती आणि लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला."
ते पुढे सांगतात, "बँक दिवाळखोरीत गेली तरीही ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, पण बँकेची मालमत्ता विकून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागेल."
"याशिवाय, बँक एफडी मुदत संपण्याआधी बंद केली तर त्यावर दंड लागू होतो, त्यामुळे याचा विचार करणे आवश्यक आहे."
बँकांसारखंच खासगी कंपन्यांमध्येही एफडी करता येतात, ज्यात बँकेपेक्षा 2 ते 3 टक्के जास्त व्याज मिळतं. पण अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहणं गरजेचं आहे.
जथल म्हणतात की, "खासगी कंपन्या खूप जास्त व्याज देत असतील तर सावध असलं पाहिजे. कारण जेव्हा एखादी कंपनी जास्त व्याज देण्यास तयार असते तेव्हा याचा अर्थ असा होतो की कोणीही तिला कमी दराने भांडवल देण्यास तयार नाही. म्हणून, व्याज जितके जास्त असेल तितका धोका जास्त."
ज्यांना निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न हवं असेल, तर ते पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्येही (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) गुंतवणूक करू शकतात.
सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करून पैसे कसे कमवायचे?भारतीयांना नेहमीच सोन्यात गुंतवणूक करण्याचे आकर्षण राहिले आहे. लग्नासारख्या खास प्रसंगी दागिन्यांसाठी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. शिवाय गुंतवणुकीसाठी लोक डिजिटल सोनं किंवा सोन्याची नाणी देखील खरेदी करतात.
आधी सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती, परंतु भारताची व्यापार तूट वाढल्यामुळे ही योजना बंद करण्यात आली.
आता लोकांकडे डिजिटल किंवा कागदी सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे, ज्यात गोल्ड इटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंडचा समावेश आहे. चांदीत गुंतवणूक करायची असेल तर सिल्व्हर इटीएफ आणि सिल्व्हर म्युच्युअल फंडचे पर्याय उपलब्ध आहेत.
डिजिटल स्वरूपात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा फायदा म्हणजे ते साठवण्याची किंवा त्याच्या शुद्धतेची काळजी करावी लागत नाही.
सोन्याचे दागिने घेण्यासाठी हजारो रुपये लागतात, तर डिजिटल सोनं एका रुपयापासूनही खरेदी करता येऊ शकतं.
घर किंवा दुकानात गुंतवणूक करून पैसे कसे कमवायचे?भारतामध्ये रिअल इस्टेट नेहमीच गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय राहिला आहे. लोक अनेकदा घर, दुकान, फार्म हाऊस, जमीन इत्यादीत पैसे गुंतवतात, पण अनेकदा यातील व्यवहार पारदर्शक नसतात आणि काळ्या पैशाचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.
याशिवाय, रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. त्याचा पर्याय म्हणून आता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा (आरइआयटी) पर्याय उपलब्ध आहे.
आर्थिक सल्लागार जयदेवसिंह चुडासमा म्हणाले की, "निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आरइआयटीचा पर्यायाचा अवलंब करत आहेत."
आरइआयटी अशा कंपन्या असतात, ज्या रिअल इस्टेटच्या मालकीच्या असतात किंवा त्या कंपन्या चालवतात. त्यांच्याकडे ऑफिस बिल्डिंग, वेअरहाऊस, शॉपिंग मॉल, डेटा सेंटर यासारखी मालमत्ता असते."
"गुंतवणूकदार 10 हजार रुपयांसारख्या छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकतात. त्यासाठी भाडेकरू शोधण्याची किंवा कागदपत्रं भरण्याची गरज नाही. सर्व काम आरइआयटी करते आणि त्यांना मिळणारे 90 टक्के करपात्र उत्पन्न भागधारकांना लाभांश म्हणून देणं बंधनकारक असतं."
त्याचप्रमाणे, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा आयएनव्हीआयटी हा पर्यायही उपलब्ध आहे.आयएनव्हीआयटी हे म्युच्युअल फंडासारखं आहे. ते गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून हायवे (महामार्ग), रस्ते, पाइपलाइन, वेअरहाऊस, पॉवर प्लांट यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करते आणि त्यातून मिळणारा नफा लाभांश म्हणून देते.
गुंतवणुकीचे इतर पर्याययाशिवाय, भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना, पियर टू पियर (पीटूपी) लेंडिंग (कर्ज देणं), आणि ॲसेट लिझिंगसारखे (मालमत्ता भाडेपट्टा) पर्यायही उपलब्ध आहेत.
पियर टू पियर (पीटूपी) कर्ज देण्यामध्ये गरज असलेल्या लोकांना तुम्ही पैसे उधार देता आणि त्यावर बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळतं. पण योग्य प्लॅटफॉर्म निवडणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमची गुंतवणूक एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) बनू शकते.
बर्याच वेळा स्टार्टअप्सना पैसे लागतात आणि ते गुंतवणूकदार शोधतात. जर तुम्ही जास्त जोखीम घेण्यास तयार असाल, तर तुम्ही स्टार्टअप इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यासाठी खास प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. परंतु, गुंतवणूक करण्यापूर्वी पुरेसं संशोधन करणं खूप महत्त्वाचं आहे.
(महत्त्वाची सूचना: या लेखात दिलेली माहिती केवळ आर्थिक साक्षरतेच्या उद्देशाने देण्यात आली आहे आणि तो आर्थिक सल्ला समजू नये. वाचकांना सल्ला दिला जातो की, त्यांनी स्वतः संशोधन करावं आणि गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. बीबीसी मराठी या माहितीच्या आधारावर केलेल्या गुंतवणुकीमुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी जबाबदार नाही.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.